सुवर्णकाळातील ज्येष्ठ अभिनेते सुदेश कुमार यांचे निधन

हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा

    दिनांक :03-May-2026
Total Views |
मुंबई,
Sudesh Kumar हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सुदेश कुमार यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती त्यांची मुलगी मिशिका धवन जामतानी यांनी दिली असून, या वृत्ताने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
 

Sudesh Kumar 
१९५० ते १९७० या कालखंडात सक्रिय असलेल्या सुदेश कुमार यांनी मुख्य नायक तसेच चरित्र अभिनेता म्हणून अनेक गाजलेल्या चित्रपटांत भूमिका साकारल्या. आपल्या साध्या, नैसर्गिक अभिनयशैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. कारकिर्दीच्या सुरुवातीला ते पृथ्वी थिएटर शी जोडले गेले होते, ज्यामुळे त्यांच्या अभिनयाला अधिक परिपक्वता आणि खोली लाभली.सुदेश कुमार यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक हिट आणि कल्ट चित्रपटांत काम केले. राज कपूर यांच्या अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता. छोटी बहन आणि सारंगा यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. याशिवाय ‘रॉकेट गर्ल’, ‘पैसे’, ‘धरती’, ‘वारिस’, ‘खानदान’ आणि ‘मन मंदिर’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद सिद्ध केली.फक्त अभिनयापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही योगदान दिले. १९६६ मधील दो बदन या चित्रपटात त्यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. हा चित्रपट आजही त्याच्या कथानक आणि संगीतासाठी ओळखला जातो.
त्यांच्या पार्थिवावर Sudesh Kumar  मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.सुदेश कुमार यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीने एक अनुभवी आणि समर्पित कलाकार गमावला असून, त्यांच्या आठवणी आणि योगदान सदैव जिवंत राहतील.