छत्रपती संभाजीनगर
Verul Caves bee attack छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी परिसरात आज अचानक मधमाशांच्या हल्ल्याने मोठी खळबळ उडाली. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची मोठी गर्दी असताना घडलेल्या या घटनेत तब्बल 100 पर्यटक जखमी झाले असून एका महिला पर्यटकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे वेरूळ लेणी परिसरात राज्यभरातून तसेच परराज्यातून हजारो पर्यटक दाखल झाले होते. विशेषतः लेणी क्रमांक 10 आणि प्रसिद्ध कैलास लेणी परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत होती. याच दरम्यान अचानक मधमाशांचे मोठे मोहळ उठले आणि काही क्षणांतच त्यांनी पर्यटकांवर समूहाने हल्ला करण्यास सुरुवात केली.अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावपळ सुरू झाली आणि अनेकांनी लेणी परिसरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. काही पर्यटक झाडांखाली आणि दगडी रचनेमागे आश्रय घेण्याचा प्रयत्न करताना दिसले.
या हल्ल्यात अनेकांना मधमाशांनी चावे घेतल्याने जखमा झाल्या असून 100 पर्यटकांना प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत. त्यापैकी एका महिला पर्यटकाला गंभीर स्वरूपात चावे घेतल्याने तिला तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर Verul Caves bee attack भारतीय पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने परिसरात खबरदारीचे उपाय राबवले असून काही काळासाठी पर्यटकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सुट्ट्यांच्या हंगामात घडलेल्या या घटनेमुळे वेरूळसारख्या जागतिक वारसा स्थळांवरील पर्यटक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.प्राथमिक माहितीनुसार, मधमाशांचे मोहळ अचानक का उठले याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, गर्दी आणि आवाजामुळे ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून पुढील तपास आणि सुरक्षा उपाययोजनांची आखणी सुरू आहे.