तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Yavatmal Gau Sanman Abhiyan देशाच्या संस्कृतीत गायीला असलेले अनन्यसाधारण महत्त्व आणि तिचे आध्यात्मिक व आर्थिक योगदान लक्षात घेता, गायीला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी यवतमाळ येथे ‘गो सन्मान अभियान’ मोठ्या उत्साहात राबवण्यात आले.
या अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या व्यापक स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारो गोभक्तांच्या स्वाक्षèयांचे निवेदन यवतमाळच्या तहसीलदारांना सादर करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी भारतीय गाय ही केवळ एक पशू नसून ती कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. गाईचे जतन आणि संवर्धन व्हावे, तसेच तिला कायदेशीररीत्या सर्वोच्च सन्मान मिळावा, ही काळाची गरज आहे, अशा भावना व्यक्त केल्या. या मोहिमेत सामाजिक संस्था, धार्मिक संघटना व नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला.
तहसीलदारांना निवेदन देताना शिष्टमंडळाने, जनभावनेचा आदर करून हे निवेदन राज्य व केंद्र सरकारपर्यंत त्वरित पोहोचवावे, असे सांगितले. गायीला राष्ट्रमाता घोषित केल्यास गोवंश हत्या थांबण्यास व देशी गोवंशाच्या संरक्षणास मोठी मदत होईल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.