गोंदिया,
methadone-crystal-powder : अवैध अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करताना गोंदिया शहर पोलिसांनी संजयनगर परिसरात धाड टाकून ४ लाख ४३ हजार ४०० रुपयांचा मेथॉडान (एम.डी.) क्रिस्टल पावडर जप्त केला. ही कारवाई २ मे रोजी करण्यात आली. याप्रकरणी असलान ऊर्फ बाबू इकबाल खान (२१), रा. शास्त्री वार्ड, संजयनगर, गोविंदपुर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

आरोपीच्या घराची झडती घेतली असता बेडरूममधील लोखंडी पेटीत ठेवलेल्या गुलाबी कापडी पिशवीत स्टीलच्या डब्यात पारदर्शक पॉलिथीनमध्ये मळकट रंगाची पावडर आढळून आली. पंचासमक्ष चौकशी केली असता सदर पावडर मेथॉडान (एम.डी.)असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या अंमली पदार्थाचे वजन १९.७ ग्रॅम असून त्याची किंमत प्रति ग्रॅम २२ हजार रुपये प्रमाणे ४ लाख ३३ हजार ४०० रुपये व १० हजार रुपयांचा मोबाईल फोन असा एकूण ४ लाख ४३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत कलम ८ (क), २२ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव गेडाम करीत आहेत.