पुणे,
22 Suspended in Pune Toxic Liquor Case पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्यूंचा आकडा वाढत 19 वर पोहोचला असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने संपूर्ण पुणे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासन आणि पोलिस यंत्रणा आता पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आली आहे. या गंभीर प्रकरणानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी मोठी कारवाई करत एकूण 9 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील 13 कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
हडपसर परिसरातील प्रकरणात पोलिस प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्तांनी तातडीने 3 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले. यामध्ये हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या ठिकाणी नवीन प्रभारी अधिकारी म्हणून अशोक ईप्पर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरातील प्रकरणातही कठोर कारवाई करण्यात आली आहे. दापोडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय वाघमारे, तपास पथक प्रमुख आणि चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांची बदली करून त्यांना पोलीस नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागावरही मोठी कारवाई झाली असून पुणे विभागातील 13 जणांना निलंबित करण्यात आले आहे. यात निरीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अवैध दारू विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे अवैध दारू व्यवसाय कोणाच्या संरक्षणाखाली सुरू होता आणि दोषींवर पुढे काय कारवाई होणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. मृतांचा वाढता आकडा आणि प्रशासनातील कारवाईमुळे पुण्यातील वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे.