नवी दिल्ली,
A Warning for Rishabh Pant लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघात आगामी आयपीएल हंगामापूर्वी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संघाचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतरही ऋषभ पंत यांच्या भवितव्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरुवातीला हा निर्णय संघातील अंतर्गत वादांना पूर्णविराम देईल असे मानले जात होते, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत असल्याचे समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लखनौ सुपर जायंट्स व्यवस्थापन पुढील हंगामापूर्वी पंतला संघातून मुक्त करण्याच्या पर्यायावर गंभीरपणे विचार करत आहे. २०२५ च्या मेगा लिलावात तब्बल २७ कोटी रुपयांना पंतला खरेदी करण्यात आले होते, मात्र अपेक्षित कामगिरी न झाल्याने फ्रँचायझीमध्ये नाराजी वाढत असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या दोन हंगामांत पंतने २८ सामन्यांत ५८१ धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट १३५.७४ आणि सरासरी २६.४० इतकी राहिली आहे. कर्णधार म्हणूनही त्याची कामगिरी समाधानकारक ठरली नाही. या काळात संघाने २८ पैकी केवळ १० सामने जिंकले असून विजयाची टक्केवारी ३५.७१ इतकी राहिली आहे. २०२६ च्या हंगामात तर संघाची कामगिरी अधिकच घसरल्याचे चित्र दिसते, जिथे १४ सामन्यांत केवळ ४ विजय मिळाले.या पार्श्वभूमीवर संघ व्यवस्थापनात मोठ्या पुनर्रचनेची चर्चा सुरू झाली आहे. फ्रँचायझीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, पंतने स्वतः कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि ती स्वीकारण्यात आली. संघाचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी सांगितले की हा निर्णय सोपा नव्हता आणि ड्रेसिंग रूममध्ये पंतचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. तसेच त्यांनी पुढील टप्प्यात संघ पुनर्रचनेवर लक्ष केंद्रित केले जाईल असे स्पष्ट केले.
संघातील सूत्रांचे म्हणणे आहे की, पंतच्या मोठ्या मानधनाच्या तुलनेत कामगिरी अपेक्षेप्रमाणे न झाल्याने व्यवस्थापनात असंतोष वाढला आहे. त्याचवेळी निकोलस पूरन यांच्या बाबतीत मात्र तुलनेने स्थैर्य दिसत असून, मागील हंगामातील प्रभावी कामगिरीमुळे त्याच्यावर अजूनही विश्वास कायम आहे. या संघात जस्टिन लँगर आणि केन विल्यमसन यांसारख्या अनुभवी व्यक्तींचा समावेश असल्याने संघ अधिक संतुलित करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. एकूणच, पंत आणि पूरन यांच्यावर मोठी गुंतवणूक करूनही अपेक्षित निकाल न मिळाल्याची चर्चा आयपीएल वर्तुळात जोरात आहे. त्यामुळे आगामी हंगामापूर्वी एलएसजी कोणते निर्णायक बदल करते आणि ऋषभ पंत संघात राहतो की बाहेर पडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.