गंगानगर/जयपूर
AI misuse blackmail case कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एका तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर तांत्रिक तपास आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला जेरबंद केले. या प्रकरणामुळे एआयच्या गैरवापराचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगानगरमधील रहिवासी असलेल्या एका तरुणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका तरुणीचे फोटो आणि व्हिडिओ मिळवून त्यात एआयच्या साहाय्याने अश्लील बदल केले. हे बनावट व आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ नंतर तिच्या ओळखीच्या व्यक्तींना पाठवून तो सतत तिला ब्लॅकमेल करत होता. तसेच तो तरुणीवर व्हिडिओ कॉल करण्यासाठी दबाव टाकत असल्याचेही समोर आले आहे.
वारंवार होणाऱ्या मानसिक त्रासामुळे पीडित तरुणीने अखेर जयपूरमधील करधनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तक्रारीनंतर करधनी पोलीस ठाण्याचे प्रभारी सवाई सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपासाची प्रक्रिया राबवण्यात आली आणि आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.तपासादरम्यान आरोपीची ओळख गंगानगरच्या हिंदूमलकोट येथील निर्मल सिंग अशी झाली. ओळख निश्चित झाल्यानंतर पोलिसांचे पथक त्या भागात पाठवण्यात आले. काही दिवस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. मात्र, अटक करण्याच्या प्रयत्नात आरोपीने भारत-पाकिस्तान सीमेकडे पळ काढण्याचा प्रयत्न केला. सुमारे आठ किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी अखेर त्याला ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात आली.
अटकेदरम्यान आरोपीकडून AI misuse blackmail case एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून त्यात डिजिटल पुरावे मिळाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. प्राथमिक तपासात आरोपीने बनावट सोशल मीडिया आयडी तयार करून अनेक आक्षेपार्ह कमेंट्स आणि संदेश पाठवल्याचेही स्पष्ट झाले आहे.करधनी पोलीस ठाण्याचे अधिकारी सवाई सिंग यांनी सांगितले की, या प्रकरणात आरोपीची ओळख पटवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करण्यात आला. बनावट आयडीमुळे सुरुवातीला तपास कठीण झाला असला तरी डिजिटल फॉरेन्सिक आणि एआय-आधारित विश्लेषणाच्या मदतीने आरोपीपर्यंत पोहोचता आले.सध्या आरोपी निर्मल सिंग पोलिस कोठडीत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील सुरक्षितता, एआयचा जबाबदारीने वापर आणि डिजिटल गुन्हेगारीविरोधातील आव्हाने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहेत.