*भटाळी ओपनकास्ट खाण अपघात प्रकरण
चंद्रपूर,
Bhatali Open-cast Mine Accident Case वेकोलि परिसरातील भटाळी खाणीत 11 मार्चच्या रात्री झालेल्या अपघातात गाळ आणि पाण्यात बुडालेली कोट्यवधी रुपये किंमतीची पोकलेन मशीन बाहेर काढण्यात अखेर 27 मे रोजी वेकोलि अधिकार्यांना यश आले. सुमारे अडीच महिने हे कोट्यावधीचे यंत्र दलदलीत अडकून पडले होते. यंत्र बाहेर काढण्यासाठी तेथील गाळ काढण्यासाठी व्यवस्थापनाने नागपुरातील एका खासगी कंपनीला लाखो रुपयांचे कंत्राट दिले. परंतु, निर्धारित मुदतीनंतरही ती ‘स्लरी’ त्यांना पूर्णपणे काढता आली नव्हती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुभवी खासगी कंत्राटदार कंपनी खाण क्षेत्रात काम योग्यरित्या करू शकली नाही आणि काम मध्येच सोडून गेली. तयानंतर वेकोलि अधिकार्यांनी स्वत: आघाडी घेतली. चंद्रपूर परिसरातील अधिकार्यांनी अनेक दिवस सतत प्रयत्न केले आणि माजरी आणि वणी भागातून अतिरिक्त यंत्रणा मागविण्यात आली. अखेर कठोर परिश्रमानंतर ही पीसी मशीन बाहेर काढण्यात आली.
Bhatali Open-cast Mine Accident Case 11 मार्चच्या रात्री भटाळी येथील खुल्या खाणींमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात माती घसरली आणि पाण्यामुळे त्याचे रुपांतर चिखलात झाले. त्यावेळी खाणीत काम करणारे कर्मचारी आणि मशीन ऑपरेटर घटनास्थळी उपस्थित होते. परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून कर्मचारी कसेबसे पळून जाण्यात यशस्वी झाले आणि आपला जीव वाचविला. परंतु, पीसी मशीन स्लरी आणि पाण्यात बुडाली होती. या घटनेनंतर वेकोली चंद्रपूर क्षेत्राने नागपूरच्या मेसर्स इनो व्हेंचर कंपनीला स्लरी काढण्याचे कंत्राट दिले. कागदपत्रांनुसार सुमारे 52 हजार 500 घनमीटर स्लरी काढण्याचे काम सोपविण्यात आले होते. त्यासाठी 71 लाख 86 हजार रुपयांपर्यंतचा खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, खाणकामाचा अनुभव नसलेल्या कंपनीला निर्धारित मुदतीत हे काम पूर्ण करता आले नाही. बर्याच दिवसांपासून पाणी आणि चिखलात अडकल्यामुळे मशीनचेही नुकसान झाले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणीही आता होऊ लागली आहे. स्थानिक वेकोली व्यवस्थापनाकडून कंत्राटी कंपनीला पैसे दिले गेले आहेत की नाही, मशीनची सध्याची स्थिती काय आह,े हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, या विषयावर कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळू शकला नाही.