आईने चक्क आपल्या दोन बाळांना विकले!

    दिनांक :30-May-2026
Total Views |
* एवढेच नव्हे, तर मुलीच्या नवजात बाळालाही विकण्याचा कट
* तिन महिलांना अटक
* प्रियकर आरोपी फरार
 
चंद्रपूर,
Case of Selling a Newborn Baby चंद्रपूरमध्ये पैशासाठी स्वतःच्याच मुलांना विकणार्‍या एका आईचे अजब कृत्य उघडकीस आले आहे. आपल्या दोन निष्पाप मुलांना केवळ दोन 2 लाख रुपयांसाठी विकल्यानंतर, या निर्दयी महिलेने आपल्या 15 वर्षांच्या मुलीच्या नवजात बाळालाही विकण्याचा कट रचला होता. मात्र, रामनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळला गेला आणि संपूर्ण रॅकेट समोर आले. या प्रकरणात, रामनगर पोलिसांनी आरोपी आई आणि बाळ विकत घेणार्‍या दोन महिलांना अटक केली आहे. दरम्यान, या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अजय फुलझेले (26, रा. चंद्रपूर) सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. चौघांवर मानवी तस्करी विरोधी कायदा व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Baby
आरोपी महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर तिची ओळख अजय फुलझेले याच्याशी झाली. ते दोघे ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहू लागले. मात्र, काही दिवसांतच अजयचे लक्ष त्या महिलेच्या अल्पवयीन मुलीकडे गेले. त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. जेव्हा ती मुलगी गरोदर राहिली, तेव्हा चंद्रपूरमध्ये बदनामीच्या भीतीने अजय आणि त्याच्या आईने तिला प्रसूतीसाठी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. रुग्णालय प्रशासनाचा संशय टाळण्यासाठी, त्यांनी आमची सर्व कागदपत्रे पुरात वाहून गेली, अशी खोटी कहाणी रचली आणि मुलीचे वय 20 वर्षे असल्याचे सांगितले. मात्र, वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांना मुलीच्या वयाबद्दल शंका आली. कोणताही वेळ न घालवता, त्यांनी हे प्रकरण नागपूरच्या अजनी पोलिसांकडे सोपवले. अजनी पोलिसांनी तात्काळ झिरो एफआयआर नोंदवून चंद्रपूर पोलिसांना संपर्क केला. रामनगर पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी वाकडे यांनी या प्रकरणाच्या तपासादरम्यान पीडितेचे सविस्तर बयाण घेतले. त्यावेळी त्यांना हे प्रकरण केवळ अत्याचाराचे नसून, त्यामागे काहीतर मोठे रॅकेट असल्याचा संशय आला.
 
 
Case of Selling a Newborn Baby पोलिसांनी पीडितेच्या आईला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली, तेव्हा तिने कबूल केले की तिने यापूर्वी तेलंगणा आणि स्थानिक पातळीवर आपल्या दोन मुलांना प्रत्येकी दोन लाख रुपयांना विकले होते. ती आपल्या अल्पवयीन मुलीच्या पोटी जन्मलेल्या नवजात बाळालाही त्याच प्रकारे विकण्याची योजना आखत होती. या धक्कादायक खुलास्यानंतर, पोलिसांनी मानवी तस्करीचे आरोप लावून कारवाई अधिक तीव्र केली. पोलिसांनी एका बाल खरेदीदाराला थेट तेलंगणातील कागजनगर येथून आणि दुसर्‍या एका महिलेला चंद्रपूर येथून अटक केली. ही कारवाई रामनगर पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी वाकडे यांनी, पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उप विभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली केली. फरार मुख्य आरोपी अजय फुलझेले याला अटक करण्यासाठी पोलिस पथके ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.