सीबीएसई पोर्टलवर सायबर हल्ला

50 विद्यार्थ्यांनी प्रणालीत मिळवला अनधिकृत प्रवेश

    दिनांक :30-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
CBSE cyber attack सीबीएसईच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलच्या पेमेंट प्रणालीवर ‘घातक सायबर हल्ला‘ झाला असून सुमारे 50 विद्यार्थ्यांनी या प्रणालीत अनधिकृत प्रवेश मिळवला, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. पोर्टलवर काही अनधिकृत हल्ले झाले होते. पेमेंट गेटवे बँकेशी संबंधित होते. त्याद्वारे सुमारे 50 विद्यार्थ्यांनी या प्रणालीत प्रवेश मिळवला होता, असा दावा करण्यात येत आहे.
 

CBSE cyber attack 
सूत्रांनुसार, या समस्येमुळे पोर्टलवर शुल्काची रक्कम असामान्य पद्धतीने प्रदर्शित होऊ लागली होती. काही प्रकरणांमध्ये भरावयाची रक्कम अवघ्या 1 रुपयापासून ते 67,000-68,000 रुपयांपर्यंत बदलत होती. केवळ गंमत म्हणून किंवा कदाचित दुष्ट हेतूने, ही रक्कम बदलण्यात आली असावी. सुरुवातीला 1 रुपया आणि त्यानंतर 67-68 हजार रुपये अशी रक्कम दाखवली गेली. अशा प्रकारे सुमारे 50 विद्यार्थ्यांच्या बाबतीत CBSE cyber attack शुल्काची रक्कम बदलली गेली, असा दावा करण्यात येत आहेऋ
प्रणालीत फेरफार केल्याचा संशय
ही तांत्रिक त्रुटी प्रणालीशी जोडलेल्या एचडीएफसीच्या पेमेंट गेटवेशी संबंधित होती. पोर्टल प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्यानंतर ही समस्या उद्भवली. हे पोर्टल बऱ्याच काळापासून पूर्णपणे कार्यरत नव्हते. शुल्काच्या रकमेबाबत काही समस्या होत्या, ज्याचा फायदा घेत प्रणालीत प्रवेश मिळवलेल्या 50 विद्यार्थ्यांनी त्यात फेरफार केला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
एकत्रीकरणाची प्रक्रिया अधिक बळकट करणार
स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या चार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनाही अतिरिक्त पेमेंट गेटवे म्हणून या प्रणालीशी जोडण्यात आले आहे. मद्रास आणि कानपूर येथील तज्ज्ञ, तसेच डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी या प्रणालीची तपासणी करत असून पोर्टल व पेमेंट गेटवे यांच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया अधिक बळकट करण्याचे काम करत आहेत. ही प्रणाली निर्दोष आणि सुरळीतपणे चालावी, यासाठी संबंधित पथके प्रणालीचा कोड आणि संपूर्ण कार्यपद्धतीची सखोल तपासणी करत आहेत, असे सूत्राने सांगितले.