बंगळूर,
D.K. Shivakumar कर्नाटकातील राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते डी. के. शिवकुमार यांनी राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा करत शनिवारी राजभवनात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेतली. यावेळी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि कर्नाटक प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला उपस्थित होते.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत डी. के. शिवकुमार यांची नेतेपदी निवड करण्यात आली असून, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या मार्गातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याचे मानले जात आहे. सिद्धरामय्या यांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिल्याने पक्षात एकमताने निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीसाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बंगळूरमध्ये दाखल झाले होते. D.K. Shivakumar मिळालेल्या माहितीनुसार, डी. के. शिवकुमार हे येत्या बुधवार, ३ जून रोजी दुपारी ४:०५ वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी समारंभ राजभवनातील ग्लास हाऊसमध्ये साध्या पद्धतीने पार पडणार आहे. सुरुवातीला विधानसभेच्या पायऱ्यांवर शपथविधी घेण्याची चर्चा होती, मात्र गर्दी आणि वाहतूक व्यवस्थेच्या कारणास्तव ठिकाण बदलण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यपालांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा स्वीकारत मंत्रिमंडळ बरखास्त केल्याचे समजते. त्यामुळे कर्नाटकमध्ये सत्तांतराची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. D.K. Shivakumar काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी या बदलावर प्रतिक्रिया देताना पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सत्तांतर सुरळीत पार पडल्याचे सांगितले. तसेच आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पुन्हा मजबूतपणे सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.