अक्रा,
Ebola's Rampage in Africa आफ्रिकेतील काही देशांमध्ये इबोला विषाणूच्या नव्या प्रकारामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडा या देशांमध्ये या संसर्गाचा वेगाने फैलाव होत असून आतापर्यंत ९०० हून अधिक संशयित प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी सुमारे २२३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.जागतिक आरोग्य संघटनेने या परिस्थितीला गंभीर मानत आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. या नव्या प्रकाराला बुंदीबुग्यो स्ट्रेन म्हणून ओळखले जात असून, त्याच्या प्रसारामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
कोविड-१९ पेक्षा अधिक प्राणघातक
इबोला हा विषाणू कोविड-१९ पेक्षा अधिक प्राणघातक ठरू शकतो, कारण संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी मृत्यूदर सुमारे ५० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. मात्र, हा विषाणू हवेतून पसरत नाही, तर संक्रमित व्यक्तीच्या रक्त, घाम, लाळ किंवा इतर शारीरिक द्रव्यांच्या थेट संपर्कातूनच पसरतो. त्यामुळे त्याचा प्रसार तुलनेने मर्यादित मानला जातो.अहवालानुसार, काँगोमधील इतुरी, उत्तर किवू आणि दक्षिण किवू हे प्रदेश सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. युगांडामध्येही काही प्रकरणे नोंदवली गेली असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक आरोग्य यंत्रणा काम करत आहेत. आतापर्यंत सुमारे १०० हून अधिक प्रकरणांची अधिकृत पुष्टी झाली आहे.
भारतात खबरदारी वाढवली
भारतात अद्याप इबोलाचा कोणताही रुग्ण आढळलेला नाही, मात्र सरकारने खबरदारी वाढवली आहे. आफ्रिकन देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी कडक करण्यात आली असून विमानतळांवर आरोग्य तपासणी वाढवण्यात आली आहे. विलगीकरण व्यवस्थाही अधिक मजबूत करण्यात आली आहे. तज्ज्ञांचे मत आहे की भारताची मजबूत औषधनिर्माण क्षमता आणि संशोधन व्यवस्था इबोलासारख्या आजारांवरील लस आणि उपचार विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. नागरिकांनीही संक्रमित भागांमध्ये प्रवास टाळावा आणि लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.