एमआरपी दुरुस्ती कायदा करा : ग्राहक पंचायत

    दिनांक :30-May-2026
Total Views |
यवतमाळ, 
Grahak Panchayat सध्या वस्तूंच्या एमआरपी व्यवस्थेत सर्वसामान्य ग्राहकांची होणारी आर्थिक लूट टाळण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. विद्यमान सरकारने ती दुरुस्ती करून सामान्य जनतेचे होणारे आर्थिक शोषण थांबवावे, अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे व यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनंत भिसे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाèयांच्या वतीने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम यांनी ते स्वीकारले.
 
 
narayan
 
Grahak Panchayat  ग्राहक पंचायतच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार संपूर्ण देशभरात अन्यायकारक एमआरपीविरुद्ध आंदोलन सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून विदर्भात सर्व जिल्हा व तालुकास्तरावर प्रशासनाच्या माध्यमातून ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते निवेदन देऊन आपली मागणी रेटत आहेत. प्रांत कार्यालय प्रमुख हितेश सेठ, अ‍ॅड. राजेश पोहरे, जिनेंद्र बंगाले, चंद्रकांत गड्डमवार, संजय जोशी, प्रवीण पाटील, प्रांत कोषाध्यक्ष संतोष डोमाळे, प्रचारप्रमुख वीरेंद्र चौबे, जिल्हा सचिव डॉ. केशव चेटुले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षèया निवेदनावर असून ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने वरील निवेदन सरकारला पाठविणार आहेत. ग्राहकांच्या जिव्हाळ्याच्या या मागणीकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 12 जून रोजी राजधानी दिल्लीत जंतरमंतरवर देशभरातील कार्यकर्ते धरणे आंदोलनसुद्धा करणार असल्याची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली आहे. हे निवेदन सादर करताना ग्राहकांचे प्रतिनिधी म्हणून करळगावचे प्रशांत वानखडे तसेच राळेगावचे सुनील जवादे व इतर कार्यकर्तेसुद्धा उपस्थित होते.