'ड्रीम गर्लची' सुरेल जुबली

    दिनांक :30-May-2026
Total Views |
मुंबई
Hema Malini हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ड्रीम गर्ल’ म्हणून अजरामर झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या डायमंड जुबली वर्षानिमित्त ‘द ड्रीम गर्ल्स डायमंड जुबली कॉन्सर्ट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लेजेंड्स की कहानी, लेजेंड्स की जुबानी’ या संकल्पनेवर आहे.
 

Hema Malini 
सहा दशकांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेणारा हा कार्यक्रम केवळ संगीत मैफल नसून सिनेमा, संगीत, प्रेम, भावना आणि आठवणींचा एक अविस्मरणीय प्रवास ठरणार आहे. प्रथमच हेमा मालिनी यांचा जीवनप्रवास त्यांच्या स्वतःच्या शब्दांत, त्यांच्या चित्रपटांतील गाजलेल्या गीतांद्वारे आणि त्यांच्या कारकिर्दीचे साक्षीदार राहिलेल्या व्यक्तींच्या आठवणींमधून रसिकांसमोर उलगडणार आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे हेमा मालिनी यांचे लाईव्ह गायन. आपल्या चाहत्यांसमोर त्या प्रथमच थेट गायन सादर करणार असून त्यामुळे कार्यक्रमाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. कार्यक्रमाच्या अखेरीस त्या एक विशेष सरप्राईज गीतही सादर करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. त्यामुळे उपस्थितांना संगीत आणि आठवणींच्या माध्यमातून ‘ड्रीम गर्ल’चा संपूर्ण प्रवास पुन्हा अनुभवता येणार आहे.
या संगीतमय Hema Malini सोहळ्यात 15 सदस्यीय लाईव्ह ऑर्केस्ट्रा सहभागी होणार असून तो हेमा मालिनी यांच्या चित्रपट कारकिर्दीतील विविध टप्प्यांना सुरांच्या माध्यमातून उजाळा देणार आहे. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांतील सदाबहार गीतांसह त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सामर्थ्य, सौंदर्य आणि स्थैर्य अधोरेखित करणारे अनेक संगीतप्रयोग यावेळी सादर करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे संकल्पक आणि सूत्रधार आरजे अनिरुद्ध चावला यांनी यापूर्वीही भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना समर्पित विशेष कार्यक्रम सादर केले आहेत. ‘ऋषी कपूर लाईव्ह इन कॉन्सर्ट’, ‘रोशन से रोशन तक’, ‘ये शाम मस्तानी’ आणि ‘फिर वही आशा लाया हूँ’ यांसारख्या कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. मात्र हेमा मालिनींना समर्पित हा कार्यक्रम भावनिक जवळीक, प्रामाणिक सादरीकरण आणि दिवंगत धर्मेंद्र यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीमुळे विशेष ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.