चमोली,
accident in chamoli उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात शनिवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. देवल-लोहाजंग मोटर मार्गावर ल्वानी परिसरात एक इको व्हॅन तब्बल ४०० मीटर खोल दरीत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना एअर ॲम्ब्युलन्सच्या मदतीने देहरादूनला हलवण्याची तयारी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कार देहरादूनहून लोहाजंग येथील बँक गावाकडे परतत होती. या वाहनात एकूण सहा जण होते आणि सर्वजण एका अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावी घेऊन जात होते. देहरादूनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या एका नातेवाईकाचा मृतदेह घेऊन कुटुंबीय गावाकडे निघाले असताना ही दुर्दैवी घटना घडली. पहाटे सुमारे चारच्या सुमारास वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट खोल दरीत कोसळल्याचे प्राथमिक अंदाजातून स्पष्ट होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, एनडीआरएफ आणि डीडीआरएफच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. कठीण भौगोलिक परिस्थिती आणि खोल दरीमुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरले. तरीही पथकांनी मोठ्या प्रयत्नांनी जखमी आणि मृतांना बाहेर काढले.
या अपघातात बलबीर सिंग (वय ५२), त्यांची पत्नी शांती देवी (वय ४८) आणि त्यांचा मुलगा अंशू बिष्ट (वय १८) यांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही एकाच कुटुंबातील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे. जखमींमध्ये कविता देवी (वय ३२), खुशाल सिंग यांचा आठ वर्षांचा मुलगा मयंक सिंग आणि १८ वर्षीय रोशनी यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासानुसार, चालकाला झोप लागल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.accident in chamoli या घटनेनंतर परिसरात शोकाकूल वातावरण असून प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे.
जखमींवर सध्या देवल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना विशेष वैद्यकीय उपचारासाठी एअर ॲम्ब्युलन्सने देहरादूनला हलवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. स्थानिक प्रशासन या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहे.