नवी दिल्ली,
inesh Phogat Granted Permission २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीदरम्यान कुस्तीपटू विनेश फोगाटच्या सहभागावरून निर्माण झालेला वाद अखेर निवळला आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या या चाचण्यांमध्ये तिला ५३ किलो वजनी गटात स्पर्धा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.सुरुवातीला सकाळी वजन मोजणीदरम्यान विनेशला फक्त ५० किलो गटातच सहभागी होण्याची सूचना देण्यात आली होती. या निर्णयावर तिने आक्षेप घेत भेदभावाचा आरोप केला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष संजय सिंह यांनी हस्तक्षेप करत तिला ५३ किलो गटात सहभागी होण्याची परवानगी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, विनेशचे वजन ५३.९ किलो असल्याचे समोर आले असून तिचा समावेश ५३ किलो वजनी गटात करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता ती या गटातील निवड चाचणीत स्पर्धा करू शकणार आहे.या गटात तिचा सामना अनुभवी कुस्तीपटू आणि नव्या खेळाडूंशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवड चाचणीदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने इंदिरा गांधी स्टेडियम परिसरात CRPF आणि RAF जवान तैनात करण्यात आले आहेत.
WFI अध्यक्ष संजय सिंह यांनी स्पष्ट केले की, विनेशच्या बाजूने भेदभावाचा कोणताही हेतू नव्हता. त्यांच्या म्हणण्यानुसार, तिने कोणत्या वजनी गटात खेळायचे आहे याबाबत स्पष्टता दिली नव्हती, त्यामुळे प्रारंभी निर्णय गोंधळात गेला. मात्र नंतर परिस्थिती स्पष्ट झाल्यानंतर तिला ५३ किलो गटात सहभागी करून घेण्यात आले.विनेश फोगाटने यापूर्वी ५० किलो गटात अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. मात्र आता तिने पुढील काही वर्षे स्पर्धात्मक कुस्ती सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून विविध वजनी गटांमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानेही WFI ला विनेशला ‘प्रतिष्ठित खेळाडू’ म्हणून मान्यता देण्याचे आणि निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी देण्याचे निर्देश दिले होते.