वाशीम,
ladki bahin scheme मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहिलेल्या पात्र महिलांसाठी विशेष केवायसी मोहीम राबवून नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी वाशीम जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने राजीव गांधी पंचायत राज चे अध्यक्ष अमोल शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची व लोकाभिमुख योजना आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदतीचा आधार मिळत असून, शासनाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले आहे. मात्र, योजना सुरू झाल्यानंतर विविध कारणांमुळे अनेक पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना केवायसी प्रक्रिया पूर्ण न होणे, तांत्रिक अडचणी, आवश्यक कागदपत्रांची अपूर्णता, अर्ज प्रक्रियेची अपुरी माहिती आदी कारणांमुळे अर्ज सादर करता आले नाहीत. आज पात्र असलेल्या अनेक महिलांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. याशिवाय काही महिलांचे अर्ज विविध तांत्रिक कारणांमुळे अपूर्ण राहिले किंवा सादरच होऊ शकले नाहीत.ladki bahin scheme या सर्व परिस्थितीमुळे राज्यातील हजारो पात्र व गरजू महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.
राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ही योजना प्रत्येक पात्र लाडया बहिणी पर्यंत पोहोचणे ही शासनाची सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे या मागणीचा सकारात्मक व तातडीने विचार करून वंचित महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी अमोल शिंदे यांनी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.