वर्धा,
Jyotiba Chithrarath महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे संस्थापक अध्यक्ष व मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. त्या चित्ररथाचे वर्धेत स्वागत करण्यात आले. या चित्ररथामध्ये महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचे अर्धाकृती पुतळे तसेच महात्मा फुले यांचा पुर्णाकृती पुतळा आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. यासोबतच छत्रपती शाहू महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही पुतळे चित्ररथावर होते. विशेष म्हणजे, महात्मा फुले लिखित पुस्तक व पेन या ज्ञानाच्या प्रतिकांची प्रभावी मांडणी करून समाजप्रबोधनाचा संदेश दिला. यामध्ये भिडेवाड्याची प्रतिकृती देखील साकारण्यात आली आहे.
Jyotiba Chithrarath हा चित्ररथ समता, बंधुता, न्याय आणि ज्ञान या मूल्यांचा प्रसार करत वर्धा शहरांमध्ये पोहोचत प्रत्येक ठिकाणी शहरातील महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. या चित्ररथाचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने व नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आर्वी नाका येथे स्वागत करण्यात आले. या चित्ररथाच्या स्वागताकरिता जिल्हाध्यक्ष विशाल हजारे, संघटक विनय डहाके, महिला जिल्हाध्यक्ष कविता मुंगले, नगरसेवक सचिन होले, रोहिणी पाटील, गोपी त्रिवेदी, बंटी खडसे, विक्रांत चौधरी, भरत चौधरी, डॉ. कपिल मून, भारती मसने, जयवंत भालेराव, अतुल गुल्हाने, आदी उपस्थित होते.