सिरोंचा,
krushi utpanna bazar samiti कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत सभापती सतीश गंजेवार यांच्याविरोधात सादर करण्यात आलेला अविश्वास ठराव अखेर मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे गंजीवार यांना सभापतीपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली असून बाजार समितीच्या सत्ताकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाजार समितीच्या कारभारात कथित मनमानी, आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत काही संचालकांनी सभापती सतीश गंजेवार यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावाला बाजार समितीतील बहुसंख्य सदस्यांनी पाठिंबा दिल्याने अखेर तो बहुमताने मंजूर झाला.
या संपूर्ण घडामोडीत युवा नेतृत्व म्हणून उदयास येत असलेल्या ऋतुराज हलगेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांनी बाजार समितीतील कथित गैरव्यवहारांविरोधात भूमिका घेत सदस्यांना एकत्र आणल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या पुढाकारामुळेच अविश्वास ठराव यशस्वी झाल्याचे समर्थकांकडून बोलले जात आहे. अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर बाजार समितीच्या परिसरात समर्थकांनी आनंद व्यक्त केला. काही ठिकाणी फटाके फोडून आणि एकमेकांचे अभिनंदन करून कार्यकर्त्यांनी विजयाचा उत्सव साजरा केला. तर दुसरीकडे या निकालामुळे गंजीवार समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
krushi utpanna bazar samiti राजकीय जाणकारांच्या मते, हा केवळ सभापती बदलण्याचा विषय नसून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भविष्यातील कारभाराची दिशा ठरवणारा निर्णय मानला जात आहे. आगामी काळात नवीन सभापती निवडीची प्रक्रिया पार पडणार असून बाजार समितीतील सत्तासमीकरणे आणखी बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अविश्वास ठरावानंतर भ्रष्टाचार व अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी काही सदस्यांनी केली आहे. त्यामुळे येत्या काळात बाजार समितीच्या कामकाजाबाबत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.