चिंतेचे वातावरण! रणरणत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू

    दिनांक :30-May-2026
Total Views |
जालना
Manoj Jarange Patil मराठा आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारचा मंडप किंवा सावलीची व्यवस्था न करता थेट शेतशिवारातील मोकळ्या जागेत खाटेवर बसून आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत समर्थकांमध्ये तसेच राज्यभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

 Manoj Jarange Patil, Maratha Reservation Protest, 
जालना जिल्ह्यात सध्या Manoj Jarange Patil  उष्णतेची तीव्र लाट कायम असून आज कमाल तापमान ४०.५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. किमान तापमान २७.३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून दिवसभर आकाश निरभ्र राहणार आहे. सकाळी हवेतील आर्द्रता सुमारे ६० टक्के असली तरी दुपारपर्यंत त्यात घट होऊन वातावरण अधिक उष्ण आणि कोरडे होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्याने त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
 
 
उपोषणाला बसण्यापूर्वी समर्थकांच्या Manoj Jarange Patil  उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आंदोलनाची औपचारिक सुरुवात केली. उन्हाच्या तीव्रतेपासून काही प्रमाणात संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी डोक्याला भगव्या रंगाचा रुमाल बांधला असला तरी ते उघड्यावरच बसून आहेत. दुपारच्या वाढत्या उन्हामुळे त्यांना उन्हाचे चटके बसू लागल्याचे चित्र परिसरात दिसून आले.दरम्यान, उपोषणाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीकडे मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी आणि चर्चांना वेग आला असून परिसरात आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या उपोषणाची माहिती मिळताच अनेकांनी त्यांना सावलीत बसून आंदोलन करण्याची विनंती केली आहे.याच पार्श्वभूमीवर राज्याचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या चर्चेनंतर जरांगे पाटील आपल्या आंदोलनाबाबत किंवा उपोषणाच्या स्वरूपाबाबत काही निर्णय घेतात का, याकडे आता राज्यभरातील नागरिकांचे आणि मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि प्रलंबित मागण्यांची तत्काळ पूर्तता करावी, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी यापूर्वीही मांडली आहे. त्यांच्या नव्या उपोषणामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.