जालना,
Maratha reservation protest मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. अंतरवली सराटी येथे शेतशिवारात रणरणत्या उन्हात त्यांनी हे उपोषण सुरू केल्याने आंदोलनाला पुन्हा एकदा तीव्रता प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या हालचालीही वाढल्या असून, चर्चेचा नवा प्रयत्न करण्यात आला.
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज अंतरवली सराटीत दाखल झाले. त्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, जरांगे पाटील यांनी आपला उपोषण सुरूच राहील अशी ठाम भूमिका घेतल्याने चर्चेतून तातडीचा तोडगा निघू शकला नाही. या भेटीदरम्यान विखे पाटील यांनी शासनाचा मसुदा (ड्राफ्ट) सादर केला असून, कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेत निष्काळजीपणा करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश दिल्याची माहितीही दिली.
पत्रकारांशी बोलताना Maratha reservation protest विखे पाटील यांनी सांगितले की, आतापर्यंत राज्यात सुमारे तीन लाख कुणबी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. हैद्राबाद गॅझेटनुसार नवीन प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू असून वंशावळी निश्चित करण्याचे कामही प्रगतिपथावर आहे. काही ठिकाणी अधिकाऱ्यांकडून दाखले देण्यात दिरंगाई झाल्याचे मान्य करत, प्रशासकीय त्रुटी दूर केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत उपोषण सुरूच ठेवण्याचा पुनरुच्चार केला. “कितीही निर्णय घेतले तरी त्यावर आव्हान दिले जाते, त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळण्यात अडथळे येतात,” असे ते म्हणाले. सरकारने आरक्षणाबाबत दिलेले निर्णय विविध पातळ्यांवर आव्हानित होत असल्याने समाजाच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
“मी उपोषण सोडणार नाही. मी उन्हातच बसेन. मी बसलो तर सरकारला चटके लागतील,” असे म्हणत त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला. संध्याकाळपर्यंत राज्यातून येणाऱ्या अभ्यासकांशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.या पार्श्वभूमीवर अंतरवली सराटी परिसरात तणावपूर्ण, परंतु नियंत्रणात असलेली परिस्थिती पाहायला मिळत आहे. सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संवाद सुरू असला तरी अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असलेले हे आंदोलन पुढे कोणते वळण घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.