‘बेस्ट टी’चा मान भारताला!

मसाला चहा ठरला जगात नंबर वन

    दिनांक :30-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Masala Tea Ranked Number One चहाप्रेमींसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. जगभरातील खाद्यपदार्थ आणि पेयांचे मूल्यमापन करणाऱ्या प्रसिद्ध ‘टेस्टॲटलस’ने प्रसिद्ध केलेल्या नव्या क्रमवारीत भारतीय मसाला चहाला ‘जगातील सर्वोत्तम चहा’ म्हणून मान्यता दिली आहे. मसाल्यांचा सुगंध, दुधाचा गोडवा आणि चहाची कडक चव यांचा सुरेख मिलाफ असलेल्या मसाला चहाने जागतिक स्तरावर सर्वांची मने जिंकली आहेत. भारतात चहा हा केवळ पेय नसून दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग मानला जातो. घरातील सकाळची सुरुवात असो, कार्यालयातील कामाचा ताण असो किंवा मित्रमैत्रिणींसोबतच्या गप्पा असोत, चहाचा कप प्रत्येक प्रसंगाला खास बनवतो. आता या भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग जगभरातही गौरवला गेला आहे.
 
 
 
Masala Tea Ranked Number One
 
या जागतिक यादीत भारतासह आशियातील अनेक दर्जेदार चहांचा समावेश करण्यात आला आहे. जपानचा होजिचा आणि सेन्चा, श्रीलंकेचा सिलोन ब्लॅक टी तसेच चीनचा पु-एर्ह यांसारख्या प्रसिद्ध चहांनाही स्थान मिळाले आहे. मात्र, या सर्वांमध्ये भारतीय मसाला चहाने पहिला क्रमांक पटकावत विशेष छाप पाडली. विशेष म्हणजे, या यादीत भारतातील विविध राज्यांमधील सहा वेगवेगळ्या प्रकारच्या चहांचाही समावेश करण्यात आला आहे. मसाला चहासोबत दार्जिलिंग चहा, आसाम चहा, केरळचा सुलेमानी चहा, हिमाचल प्रदेशातील कांग्रा चहा आणि काश्मीरचा पारंपरिक नून चहा यांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे. दार्जिलिंग चहाला त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सुगंधामुळे ‘चहाचा शॅम्पेन’ म्हणूनही ओळखले जाते.
 
 
याशिवाय, पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक मकाईबारी टी इस्टेटलाही आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली आहे. भारतीय चहाच्या विविधतेची आणि गुणवत्तेची ही जागतिक पातळीवरील दखल मानली जात असून, देशातील चहाउद्योगासाठी ही मोठी अभिमानाची बाब ठरली आहे. भारतीय मसाला चहाला मिळालेला हा सन्मान केवळ एका पेयाचा गौरव नसून, भारतीय चव, परंपरा आणि संस्कृतीच्या जागतिक स्वीकाराचे प्रतीक मानले जात आहे.