मुंबई,
Mumbai crime मुंबईतील RCF पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक आणि गंभीर स्वरूपाची घटना उघडकीस आली असून, पतीने पत्नीवर अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. किरकोळ कौटुंबिक वादातून सुरू झालेला हा प्रकार पुढे अत्याचार आणि जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय आरोपी अरबाज सय्यद याने आपल्या पत्नीला घरात कोंडून ठेवत तिच्यावर अमानुष मानसिक व शारीरिक छळ केला. आरोपीने पत्नीला धमकावत तिच्यावर ॲसिड फेकण्याची आणि तलवारीने वार करण्याची भीती दाखवली. एवढ्यावरच न थांबता त्याने तिला तब्बल चार तास घरातच “कोंबडा” बनून उभे राहण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पीडितेवर गंभीर मानसिक आघात झाल्याचे सांगितले जात आहे.छळातून कशीबशी सुटका करून पीडित महिला माहेरी निघून गेल्यानंतर आरोपीचा राग अधिकच वाढला. त्यानंतर अरबाज सय्यद थेट तिच्या माहेरी पोहोचला आणि तेथे त्याने मोठा धिंगाणा घालत पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर Mumbai crime उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. घटनेनंतर कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधत मदत मागितली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली आहे. प्राथमिक तपासात आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्यावर चोरी, मारहाण आणि धमकावणे अशा स्वरूपाचे तब्बल १९ गुन्हे यापूर्वी नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे अधिक गंभीर दृष्टीने पाहिले जात आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमुळे शहरातील सुरक्षेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.