मुंबई
Mumbai Water Metro Project मुंबईत प्रस्तावित जल मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता प्रत्यक्ष गती मिळताना दिसत आहे. या प्रकल्पासाठी मागविण्यात आलेली पहिली अत्याधुनिक कॅन्डेला पी-12 इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल झाली असून, तिचे आगमन 27 मे रोजी झाले. सध्या ही बोट जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPT) येथे कस्टम क्लिअरन्सच्या प्रतीक्षेत आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील जलवाहतुकीचे जाळे अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्टम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या फेरीची प्राथमिक चाचणी घेण्यात येईल. चाचण्या यशस्वी ठरल्यानंतरच ती प्रवासी सेवेसाठी वापरण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने या चाचण्या अत्यंत महत्त्वाच्या असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.कँडेला P-12 इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल फेरी ही हाय-स्पीड इलेक्ट्रिक फेरी पाण्यावर तरंगण्याऐवजी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाच्या मदतीने पाण्याच्या वर उचलली जाते, ज्यामुळे कमी प्रतिकारात वेगवान आणि अधिक स्थिर प्रवास शक्य होतो. या बोटीचा कमाल वेग सुमारे 40 किलोमीटर प्रति तास असून, एका वेळी सुमारे 30 प्रवासी प्रवास करू शकतात, अशी माहिती पुरवठादार कंपनीकडून देण्यात आली आहे.या Mumbai Water Metro Project जल मेट्रो फेरींसाठी दोन प्रमुख मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. पहिला मार्ग गेटवे ऑफ इंडिया अलिबाग असा असून, दुसरा मार्ग मांडवा ते वर्सोवा असा असेल. हे मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशातील समुद्री प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मुंबई महानगर प्रदेशात सुमारे 340 किलोमीटर लांबीचे जलवाहतुकीचे जाळे विकसित करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. या प्रकल्पात आधुनिक टर्मिनल्स, नवीन जलमार्ग आणि इलेक्ट्रिक फेरींचा मोठ्या प्रमाणावर समावेश केला जाणार आहे. वाहतूक कोंडी आणि लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी लक्षात घेता, हा प्रकल्प शहरी वाहतुकीसाठी पर्यायी आणि पर्यावरणपूरक उपाय ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकल्पांतर्गत सुमारे 21 मार्ग आणि 20 स्थानकांचा विकास प्रस्तावित असून, नवीन 16 जलमार्ग आणि 24 स्थानकांची उभारणीही केली जाणार आहे. एकूण गुंतवणूक हजारो कोटी रुपयांच्या घरात अपेक्षित असून, त्यातील मोठा हिस्सा इलेक्ट्रिक आणि हायब्रिड फेरींच्या खरेदीसाठी वापरला जाणार आहे.दरम्यान, देशातील इतर शहरांमध्येही जल मेट्रोचा विस्तार करण्याची योजना आखण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात श्रीनगर, पाटणा, वाराणसी, अयोध्या आणि प्रयागराज येथे सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव असून, पुढील टप्प्यात आसाममधील काही शहरांचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात देशातील अनेक शहरे जलवाहतुकीच्या नव्या पर्यायाशी जोडली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मुंबईतील या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेला पर्याय उपलब्ध होण्याबरोबरच पर्यटन आणि किनारपट्टीवरील आर्थिक घडामोडींनाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.