राजकीय 'भूकंप' राष्ट्रवादीतून भाजपाकडे ‘यू-टर्न’

    दिनांक :30-May-2026
Total Views |
अहिल्यानगर
Prajakta Tanpure अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण देत प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांनी सहज घेतलेला नसून, कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करूनच हा मार्ग निवडल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आगामी काळात विधान परिषदेवर संधी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
 

Prajakta Tanpure  
भाजपमध्ये प्रवेश करताना तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडताना भावनिक दुविधा असल्याचेही नमूद केले. जयंत पाटील आणि शरद पवार यांच्याशी थेट संवाद साधण्याची आपली हिंमत झाली नाही, मात्र सुप्रिया सुळे यांच्याकडे आपण आपली भूमिका आणि अडचणी मांडल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता, असे सांगताना त्यांनी त्या निर्णयामागे काही राजकीय आणि स्थानिक कारणे असल्याचेही सूचित केले.
भाजपमध्ये प्रवेश करण्यामागे Prajakta Tanpure  ईडीची भीती किंवा दबाव असल्याचा आरोप त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. आपल्या कारखान्याशी संबंधित प्रकरणाला स्थगिती मिळाल्याने तो विषय संपलेला आहे, त्यामुळे भीतीपोटी निर्णय घेतल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय परिस्थिती आणि भविष्यातील संधींचा विचार करूनच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना तनपुरे यांनी आपण मंत्री होण्याच्या स्पर्धेत नसल्याचेही स्पष्ट केले. “मला मंत्रीपदाची अपेक्षा नाही, तसेच मला मोठ्या अपेक्षांच्या चौकटीत बसवू नये,” अशी भूमिकाही त्यांनी मांडली. भाजप प्रवेश हा केवळ राजकीय प्रवासातील एक टप्पा असून, यामागे व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा नसल्याचे ते म्हणाले.
 
 
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी Prajakta Tanpure  राहुरी पोटनिवडणुकीदरम्यान घेतलेल्या त्यांच्या भूमिकेलाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यावेळी त्यांनी भाजपला पाठिंबा देत दिवंगत आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या कुटुंबीयांच्या बाजूने भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या निर्णयामुळे अक्षय कार्डिले यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचेही मानले जाते.तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे राहुरी आणि परिसरातील राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा प्रभाव लक्षणीय असून, नगरपालिका, बाजार समिती आणि साखर कारखाना क्षेत्रात त्यांचे मजबूत संघटन असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला स्थानिक पातळीवर बळ मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, त्यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत चर्चा सुरू झाल्या असून, पुढील राजकीय समिकरणे कशी बदलतात याकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.