पुणे
Pune toxic liquor पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्रकरणामुळे झालेल्या १५ हून अधिक मृत्यूंनंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून या प्रकरणाशी संबंधित मिथेनॉल साठवणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने भिवंडी येथील एका कंपनीवर छापा टाकून अवैधरित्या साठवून ठेवलेला तब्बल १,५२६ किलो संशयित मिथेनॉलचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
एफडीएने भिवंडीतील ‘रेक्स इंटरनॅशनल’ या कंपनीवर धाड टाकून ही कारवाई केली. प्राथमिक तपासात याच कंपनीकडून मिथेनॉलची खरेदी करून पुण्यात विषारी दारू तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीकडे साठवलेल्या मिथेनॉलबाबत कोणतीही वैध नोंद अथवा आवश्यक कागदपत्रे आढळून आली नसल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी कंपनीचे मालक आणि संबंधित व्यक्तींविरोधात भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख आरोपी योगेश वानखेडे याने मिथेनॉल मिश्रित हातभट्टीची दारू तयार करून ती पुण्यातील हडपसर, गोखलेनगर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विक्रीसाठी पुरवल्याचे तपासात उघड झाले आहे. वानखेडेने सुमारे ८४० लिटर दारू तयार केली होती. त्यापैकी अंदाजे २०० लिटर दारूची विक्री झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.पोलिसांनी आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली आहे. हडपसर परिसरातून ७० लिटर, गोखलेनगरमधून ४२० लिटर, तर दापोडी आणि फुगेवाडी परिसरातून १५५ लिटर मिथेनॉल मिश्रित दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आणखी संभाव्य जीवितहानी टळल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.तपासादरम्यान या दुर्घटनेमागील धक्कादायक कारणही समोर आले आहे. योगेश वानखेडे याला हातभट्टीच्या दारूमध्ये इथेनॉलचा वापर करायचा होता. इथेनॉलपासून मद्यनिर्मिती करता येते, याची माहिती त्याने ऑनलाइन माध्यमांतून मिळवली होती. मात्र, इथेनॉल आणि Pune toxic liquor मिथेनॉल यांतील मूलभूत फरक त्याला समजला नसल्याने त्याने चुकून मिथेनॉलचा वापर केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. मिथेनॉल हे अत्यंत विषारी रसायन असून त्याचे सेवन केल्यास गंभीर विषबाधा होऊन मृत्यू ओढवू शकतो.
याच मिथेनॉल मिश्रित दारूच्या सेवनामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील १५ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात विशेष मोहीम हाती घेतली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.