पर्यटकांच्या उत्साहाला महाजामची शिक्षा!

हिमाचल ते उत्तराखंडमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा

    दिनांक :30-May-2026
Total Views |
डेहराडून
Queues of vehicles in Uttarakhand उत्तर भारतातील मैदानी भागात उष्णतेची तीव्र लाट कायम असून अनेक शहरांमध्ये तापमान ४५ ते ५० अंश सेल्सिअसच्या दरम्यान पोहोचले आहे. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी लाखो नागरिकांनी हिमालयीन पर्यटनस्थळांचा रुख केला आहे. परिणामी हिमाचल प्रदेशातील मनाली, रोहतांग पास तसेच उत्तराखंडमधील नैनिताल, बद्रीनाथ, हेमकुंड साहिब, औली आणि जोशीमठ येथे पर्यटक आणि भाविकांची विक्रमी गर्दी उसळली आहे.डोंगराळ भागांमध्ये थंडगार वारे, हलका पाऊस आणि काही ठिकाणी सुरू असलेली हिमवृष्टी यामुळे पर्यटकांना आकर्षण वाटत आहे. मात्र या वाढत्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली असून अनेक ठिकाणी किलोमीटरच्या किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मनाली-रोहतांग मार्गावर केवळ ५० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी पर्यटकांना तब्बल सात ते आठ तासांचा कालावधी लागत आहे. रोहतांगकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक वाहनचालक तासन्तास अडकून पडल्याचे चित्र दिसत आहे.
 
 

fy678 
नैनितालमध्येही पर्यटन हंगाम शिगेला पोहोचला आहे. मॉल रोड, स्नो व्ह्यू, प्राणीसंग्रहालय आणि नैनी तलाव परिसर पर्यटकांनी गजबजून गेला आहे. नौकाविहारासाठी लांबच लांब रांगा लागत असून शहरातील बहुतांश हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि होमस्टे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. स्थानिक व्यावसायिकांसाठी हा हंगाम फायदेशीर ठरत असला तरी वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. दरम्यान, चारधाम यात्रेमुळे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यावरही मोठा ताण निर्माण झाला आहे. बद्रीनाथ आणि हेमकुंड साहिबकडे जाणाऱ्या मार्गांवर १५ ते २० किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. प्रशासनाने वाहतूक नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या असल्या तरी यात्रेकरू आणि पर्यटकांच्या प्रचंड संख्येमुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवणे आव्हानात्मक ठरत आहे.बाबा नीम करोली महाराजांच्या कैंची धाममध्येही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. देश-विदेशातून येणाऱ्या भक्तांमुळे मंदिर परिसर सतत गजबजलेला असून आगामी स्थापना दिन सोहळ्यामुळे गर्दीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.