बंगला सोडणार नाही! राबडी देवींचा ठाम पवित्रा

    दिनांक :30-May-2026
Total Views |
पाटणा,
Rabri Devi's firm stance बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा शासकीय निवासस्थानाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी त्यांना देण्यात आलेला सरकारी बंगला रिकामा करण्यास स्पष्ट नकार देत राज्य सरकारला थेट आव्हान दिले आहे. बंगला रिकामा करायचा असेल तर पोलीस दल आणा, पण मी घर सोडणार नाही, असे ठाम वक्तव्य त्यांनी केले. राज्याच्या बांधकाम विभागाने अलीकडेच राबडी देवींना १० सर्क्युलर रोड येथील निवासस्थान तातडीने रिकामे करण्याची अंतिम नोटीस बजावली होती. जवळपास दोन दशकांपासून लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाचे हे प्रमुख निवासस्थान राहिले असून, याआधीही अनेक वेळा नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप बंगला रिकामा करण्यात आलेला नाही.
 
 
 
rabri devi
 
दिल्लीहून पाटणा येथे परतल्यानंतर प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली असता, राबडी देवी यांनी सुरुवातीला प्रतिक्रिया देणे टाळले. त्यानंतर त्यांनी थेट सरकारलाच आव्हान देणारे विधान केले. त्यांच्या या भूमिकेमुळे त्या नव्याने वाटप करण्यात आलेल्या निवासस्थानी जाण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राबडी देवींना ३९ हार्डिंग रोड येथील नवीन शासकीय निवासस्थान मंजूर करण्यात आले होते. याबाबत अधिकृत पत्रही देण्यात आले होते. मात्र सहा महिन्यांहून अधिक कालावधी उलटल्यानंतरही त्यांनी जुन्या निवासस्थानाचा ताबा सोडलेला नाही.
 
 
दरम्यान, राज्य सरकारने १० सर्क्युलर रोड येथील बंगला पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नंद किशोर राम यांना वाटप केला आहे. त्यामुळे नवीन लाभार्थ्याला ताबा देण्यासाठी प्रशासनाने कारवाईचा वेग वाढवला असून राबडी देवींना अंतिम नोटीसही बजावण्यात आली आहे.हे निवासस्थान लालू कुटुंबासाठी केवळ सरकारी बंगला नसून अनेक राजकीय आणि कौटुंबिक आठवणींशी जोडलेले मानले जाते. २००५ मध्ये सत्ता गमावल्यानंतर राबडी देवींना हे घर देण्यात आले होते. नंतर न्यायालयाने माजी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी पद सोडल्यानंतर सरकारी निवासस्थान कायमस्वरूपी ताब्यात ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते.