अतिक्रमण, बंद पथदिवे व दूषित पाणीपुरवठा..!

    दिनांक :30-May-2026
Total Views |
राळेगाव प्रभाग 13 मधील नागरिक त्रस्त

राळेगाव, 
Ralegaon Nagar Panchayat राळेगाव नगर पंचायत अंतर्गत शिवाजीनगर प्रभाग 13 मधील नागरिकांनी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्रस्त झाले आहेत. दत्त मंदिराजवळील विहिरी परिसरात अतिक्रमण वाढत असून संबंधित ठिकाणी लिंबाच्या झाडाजवळ दररोज वाहनांचे पार्किंग होत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही नगरसेवक व नपं प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
 
 
Ralegaon Nagar Panchayat
 
परिसरातील तब्बल 6-7 पथदिवे बंद असल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य पसरत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय अनेकांनी मुख्य पाणीपुरवठा लाईनजवळच अनधिकृत नळ जोडून घेतल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
मुख्य पाईपलाईनजवळ खड्डे करून ठेवण्यात आल्याने साचलेली घाण नळाच्या पाईपलाईनमध्ये मिसळत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे घराघरात दूषित व दुर्गंधयुक्त पाणी पोहोचत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांत साथीच्या आजाराची भीती व्यक्त होत आहे.
 
 
Ralegaon Nagar Panchayat  पंचायत प्रशासनाला अनेकदा तोंडी व लेखी तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. शिवाजीनगर परिसरातील अतिक्रमण हटवून पथदिवे तत्काळ सुरू करावे, अनधिकृत नळजोडणीवर कारवाई करून दूषित पाणीपुरवठा थांबवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.