पोहायला गेलेल्या पिता-पुत्राचा विहिरीत बुडून मृत्यू

    दिनांक :30-May-2026
Total Views |
रामनगरतांडा गावावर शोककळा

पारवा, 
Ramnagartanda incident घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस ठाण्यांतर्गत घोटी बीटमध्ये रामनगरतांडा (घोटी) येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. गावालगतच्या विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सचिन प्रेमसिंग जाधव (वय 37) आणि त्यांचा 9 वर्षांचा मुलगा विहान सचिन जाधव अशी मृतकांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. प्राप्त माहितीनुसार, ही घटना गुरुवारी दुपारी घडली. सचिन जाधव हे व्यवसायाने शेतकरी होते. त्यांना पोहणे अवगत होते. गुरुवारी दुपारी ते आपल्या 9 वर्षांच्या मुलासह विहिरीवर पोहण्यासाठी गेले होते.
 
 
dead
 
Ramnagartanda incident  प्राथमिक अंदाजानुसार, खोल विहिरीत मुलाला पाठीवर बसवून पोहत असताना अचानक त्यांचे स्वतःवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दोघेही खोल पाण्यात बुडाले. ही बाब चुलतभाऊ सुभाष जाधव यांच्या मुलाच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने नातेवाईकांसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेची माहिती पारवा पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटंजी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. या घटनेबाबत माहिती देताना सहायक उपनिरीक्षक संदीप महाजन यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पारवा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनात पारवा पोलिस पुढील तपास करीत आहेत.