स्वा. सावरकरांच्या जीवनकार्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज

    दिनांक :30-May-2026
Total Views |
आशिष आळणे यांचे प्रतिपादन

उमरखेड, 
Swatantryaveer Savarkar स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर देशभक्त होते, देशासाठी सावरकर कुटुंबाने केलेला त्याग हा असीम त्याग आहे. सावरकरांनी उभे केलेले क्रांतिकार्य प्रत्यक्ष शत्रूच्या राष्ट्रात शत्रूला आव्हान देण्याचा प्रसंग जगाच्या पाठीवर कुठल्या देशाचा इतिहासात पाहायला मिळत नाही. सावरकरांच्या या अद्वितीय कार्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज होते हे त्यांच्या विचार, कृती व कार्य प्रवणतेतून दिसून येते, असे प्रतिपादन ख्यातनाम शिवव्याख्याते आशिष आळणे यांनी केले. वीर सावरकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे आयोजित सावरकर जयंती समारोहात ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी आमदार प्रकाश देवसरकर यांची होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावरकर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजीव देशपांडे होते.
 
 
Swatantryaveer Savarkar
 
यावेळी आळणे पुढे म्हणाले, जगाच्या इतिहासात जे-जे क्रांतिकारकांनी घडवले आहे ते सर्व क्रांतिकार्य आपल्या देशात असलेल्या राजवटीच्या विरोधात आपल्याच देशाच्या मायभूमीत झालेले क्रांतिकार्य आहे. याउलट सावरकरांनी मात्र भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी उभे केलेले क्रांतिकार्य हे इंग्रजांच्या भूमीत जाऊन उभे केले व त्याला फ्रान्सच्या भूमीतदेखील पोचवले. त्यामुळे या क्रांतिकार्याला जगाच्या क्रांतिकार्यात एक वेगळे स्थान आहे.
 
 
Swatantryaveer Savarkar  वीर सावरकरांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या कार्याला समोर ठेवूनच आपल्या कार्याची प्रेरणा तयार केली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांनी केलेल्या क्रांतिकार्याचे योगदान खूप मोठे आहे. त्यामुळे सावरकरांसारख्या प्रखर देशभक्तावर अलीकडे होणारी टीका विकृतीतून होणारी आहे. या टीकाकारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अथवा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकार्य याचा अभ्यास नसल्यामुळे केवळ पूर्वग्रहदूषित आणि द्वेषभावनेतून ही टीका होत असल्याचे आशिष आळणे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रकाश देवसरकर यांनी, शालेय जीवनापासून सावरकरांच्या क्रांतिकार्याचे धडे ऐकून देशाचा स्वातंत्र्यलढा आम्हाला समजला, या स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांच्या क्रांतिकार्याचे योगदान खूप मोठे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत आयचित यांनी, प्रास्ताविक महेश काळेश्वरकर यांनी तर पुंडलिक कुबडे यांनी आभार मानले.