त्या तिघी राष्ट्रभक्तीचा मूर्ती आदर्श : डॉ. शुभा साठे

*वर्धेत सावरकर जयंतीनिमित्त पुरस्कारांचे वितरण

    दिनांक :30-May-2026
Total Views |
वर्धा,
dr shubha sathe सावरकर घराण्यातील केवळ पुरुषच नव्हे तर बाई, माई आणि ताई अर्थात यशोदा, यमूना आणि शांता या तीन स्त्रियांनी सुद्धा मूकपणे जे सहन केले. त्यांचा त्याग रणरागिणी झाशीची राणी, धर्मव्रती अहिल्याबाई, दुर्गावती, वीरव्रती चेन्नमा आदीपेक्षा कुठेही कमी नाही. त्या तिघींनी हाती तलवार, बंदूक, बॉम्ब, घोडदौड, आदी केले नसले तरी त्यांनी राष्ट्रासाठी स्वीकारलेले देशसेवेचे सतीचे वाण, राष्ट्राभिमानीता कुठेही कोणत्याही मापाने मापली तरी उणी नाही, असे विचार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक स्वा. सावरकर साहित्याच्या अभ्यासिका डॉ. शुभा साठे यांनी व्यत केले.
 

शुभ साठे  
 
स्वा. सावरकर जयंतीनिमित्त स्थानिक स्वा. सावरकर सामाजिक सेवा समिती द्वारा सार्वजनिक वाचनालयात आयोजित समारंभात त्या ‘त्या तिघी’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक जेष्ठानंद राजपूत होते तर व्यासपीठावर समितीचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र बोरकर, वाचनालयाचे सचिव गौरीशंकर टीबडीवाल, लोकतंत्र सेनानी आणि जिल्हाध्यक्ष हरिभाऊ वझुरकर, सामाजिक सेवा रत्न पुरस्काराचे मानकरी अमरावतीचे नितीन पजई आणि ज्येष्ठ नागरिक सन्मानाचे मानकरी मेजर शशिकांत देशपांडे उपस्थित होते.
 
डॉ. शुभा साठे पुढे म्हणाल्या त्याग, शौर्य, धैर्य आणि पराक्रम या तत्त्वाला समर्पित होऊन झडती, जपती, उपवास आणि आप्तजनांनी झिडकार दिलेल्या स्थितीतही कोणाचाही आसरा नसताना बाई, माई आणि ताई यांनी परिस्थितीचा सामना धिरोदात्तपणे करीत आपल्या पतींना गर्भगळीत न होऊ देता ज्या पद्धतीने केला तो त्यांचा देशभक्तीचा संस्कार वर्तमानात केवळ भौतिक भोगवादी जीवन जगणार्‍या स्त्रियांसमोर येणे आवश्यक आहे. सावरकर कुटुंबातील स्त्रियांच्या जीवनातील घटना आणि त्यांनी जीवनात भोगलेल्या प्रसंगांची माहिती दिली. हरिभाऊ वझुरकर यांनीही विचार व्यत केले.
 
यावेळी अमरावतीचे नितीन पजई यांच्या समाज व राष्ट्रसेवेबाबत स्वा. सावरकर सामाजिक सेवा समिती द्वारा स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा रत्न सन्मान सपत्नीक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच कारगिल युद्ध आणि वाघा सीमेवर सेवा देणार्‍या मेजर शशिकांत देशपांडे यांनाही ज्येष्ठ नागरिक सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानाचे स्वरुप स्मृतीचिन्ह, स्वा. सावरकरांची प्रतिमा, शाल, श्रीफळ, ग्रंथ आहे.
 
सत्कारला उत्तर देताना पजई यांनी भारताच्या सैनिकी पराक्रमाविषयी आपल्या मनात बालपणापासूनच श्रद्धा भाव होता. परिस्थितीच्या प्रतिकूलतेमुळे आपण सैन्यात भरती होऊ शकलो नाही. पण, आपली इच्छा आपल्या दोन्ही मुलींनी पुर्ण केल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी रतदान चळवळ विषयीही मार्गदर्शन केले.
मेजर शशिकांत देशपांडे यांनी सैन्यातील युद्ध परिस्थितीत आलेल्या अनुभवाची माहिती देऊन आलेल्या अनुभवाची गाथा सांगितली. सेवानिवृत्त मेजर देशपांडे यांनी सावरकर समितीला सावरकर ग्रंथालय निर्माण कार्य करण्याचेही सूचित करून त्यासाठी ४४ हजाराच्या देणगीचा धनादेश सुपूर्द केला.
 
स्वा. सावरकर जयंती निमित्त आयोजित समारंभात समितीद्वारा २०२० मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन चरित्र व कार्य यावर आधारित घेतलेल्या विदर्भस्तरीय निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण करण्यात आले.dr shubha sathe प्रथम क्रमांक अश्विनी कुलकर्णी नागपूर, द्वितीय डॉ. प्रज्ञा पुसदकर नागपूर तर तृतीय पुरस्कार सरिता आगवन वर्धा यांना स्मृतीचिन्ह, स्वा. सावरकरांची प्रतिमा, शाल श्रीफळ, ग्रंथ आणि पारितोषकाची राशी देऊन करण्यात आला. सरीता आगवण यांनी पारितोषिक राशी सावरकर समितीला देणगी स्वरुपात समर्पित केली. प्रास्ताविक डॉ. बोरकर यांनी केले. संचालन प्रा. प्रचिती टेंभुर्णे यांनी केले. आभार ऋत्वा परसोडकर यांनी मानले.