पांढरकवडा,
Tipeshwar Sanctuary टिपेश्वर अभयारण्यात वाघीण आणि बिबट्याच्या संघर्षात अंदाजे चार वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे अभयारण्यात वन्यजीवांमधील शिकारीवरून होणारा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, टी-44 क्रमांक आणि पर्यटकांत प्रसिद्ध असलेल्या ‘डेझी’ नावाच्या वाघिणीने हरणाची शिकार केली होती. या शिकारीवर बिबट्याने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाघीण व बिबट्या आमनेसामने आले आणि दोघांमध्ये जोरदार संघर्ष झाला. या संघर्षात वाघिणीने बिबट्यावर हल्ला करून त्याला ठार केले.
संघर्षानंतर वाघिणीने बिबट्याचा मृतदेह तलावाजवळील डोंगराच्या उतरत्या भागातील बांबूच्या झुडपाखाली नेऊन ठेवला होता. नियमित गस्तीदरम्यान वनमजुरांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाèयांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ दुर्गम असल्याने तेथेच शवविच्छेदन व दहनविधी करणे शक्य नव्हते. त्यामुळे मृतदेह सुरक्षित बाहेर आणण्यात आला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाèयांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. डॉ रणजीत नाळे यांच्या नेतृत्वात डॉ. पायघन आणि डॉ. काळमेघ यांनी शवविच्छेदन प्रक्रिया पार पाडली.
Tipeshwar Sanctuary बिबट्याचा अंगावर अनेक ठिकाणी नख आणि दातांच्या खोलवर जखमा होत्या. बिबट्याचे आवश्यक नमुने व काही महत्त्वाचे अवयव जतन करून ठेवण्यात आले. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बिबट्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना अभयारण्यातील पारवा वनपरिक्षेत्र, माथनी वर्तुळ अंतर्गत बोथ बीट येथे घडली. घटनेची माहिती मिळताच वन अधिकाèयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वाघीणीसोबत झालेल्या नैसर्गिक संघर्षामध्ये बिबट्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. सर्व कार्यवाही विभागीय वन अधिकारी उत्तम फड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.