पुणे,
Toxic Liquor in Pune पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टीची दारू प्यायल्याने दोन दिवसांत तब्बल 14 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले असून प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलली आहेत. या घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक कारवाई करत हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना निलंबित केले आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात तयार झालेली ही हातभट्टीची दारू पुण्यातील विविध भागांत विकली गेली होती. या दारूमध्ये मोठ्या प्रमाणात मिथेनॉल मिसळल्याने ती अत्यंत विषारी बनली आणि अनेकांचे प्राण गेले.या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अधिक नफ्याच्या लालसेपोटी दारूमध्ये घातक रसायन मिसळण्यात आले. ही दारू विविध ठिकाणच्या अवैध अड्ड्यांवर पुरवली गेली होती.
उरळी कांचन परिसरात दारू तयार केली जात असल्याची माहिती तपासातून पुढे आली असून, त्यानंतर ती वेगवेगळ्या मध्यस्थांमार्फत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विकली गेली. काही विक्रेत्यांनी ती हडपसर, काळेपडळ आणि खडकी परिसरातही पोहोचवली असल्याचे समोर आले आहे.या घटनेनंतर राजकीय स्तरावरही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन प्रशासनावर तीव्र टीका केली. अवैध दारूविक्रीत पोलिसांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुण्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात मोठी मोहीम सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने पुढील तपास वेगाने सुरू केला असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.