वैभव १५ व्या वर्षीच टीम इंडिया दारात?

    दिनांक :30-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Vaibhav in Team India आयपीएल २०२६ मध्ये आपल्या विस्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या भारतीय संघातील निवडीबाबत चर्चा अधिकच तीव्र झाली आहे. अवघ्या १५ व्या वर्षी जगातील आघाडीच्या गोलंदाजांविरुद्ध त्याने दाखवलेली निर्भय फलंदाजी पाहता, त्याच्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आवश्यक गुणवत्ता असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनीही वैभवबाबत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, या तरुण फलंदाजाने दाखवलेली परिपक्वता आणि सातत्य पाहता तो मोठ्या स्तरावरील क्रिकेटसाठी पूर्णपणे तयार आहे. जगातील सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध त्याची फलंदाजी पाहून कोणत्याही आव्हानासाठी तो सक्षम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
vaibhav suryavanshi
 
या हंगामात वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्ससाठी जबरदस्त कामगिरी केली. ७७६ धावा आणि तब्बल २३७.३१ चा स्ट्राइक रेट यामुळे तो संपूर्ण स्पर्धेत चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. विशेष म्हणजे, त्याने जसप्रीत बुमराह, कागिसो रबाडा आणि पॅट कमिन्स यांसारख्या आघाडीच्या गोलंदाजांविरुद्धही आक्रमक फलंदाजी करून आपली क्षमता सिद्ध केली. अनेक सामन्यांमध्ये त्याने निर्णायक खेळी करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली. काही प्रसंगी तर त्याने अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा प्रवाहच बदलून टाकला. त्याच्या या कामगिरीनंतर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यासह अनेक दिग्गजांनीही त्याचे कौतुक केले आहे.
 
 
सध्या चर्चा अशी आहे की आगामी आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमध्ये, विशेषतः आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत, वैभव सूर्यवंशीला भारतीय संघाकडून संधी मिळू शकते. त्याची सातत्यपूर्ण कामगिरी पाहता निवड समिती त्याच्यावर मोठा विश्वास दाखवू शकते, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, एवढ्या कमी वयात वैभवने दाखवलेली फलंदाजी आणि आत्मविश्वास पाहता भारतीय क्रिकेटमध्ये त्याच्या भवितव्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.