नवी दिल्ली,
A Special Message in Mann Ki Baat पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा 134वा भाग रविवारी प्रसारित झाला. या संवादात त्यांनी देशभरातील प्रेरणादायी घटना, क्रीडा क्षेत्रातील कामगिरी, पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न आणि भारतीय संस्कृतीतील विविध पैलूंवर भाष्य केले. पीएम मोदींनीझारखंडमधील रांची येथे झालेल्या नॅशनल सीनियर ॲथलेटिक्स फेडरेशन स्पर्धेचा उल्लेख करत खेळाडूंचे विशेष कौतुक केले. या स्पर्धेत देशभरातून सुमारे 800 खेळाडूंनी सहभाग घेतला होता आणि चार वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय विक्रम मोडले गेले, असे त्यांनी सांगितले. गुरिंदरवीर सिंह, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार यांना त्यांनी विशेष अभिनंदन केले.
100 मीटर धावण्याच्या स्पर्धेचा उल्लेख करताना पीएम मोदी म्हणाले की, दोन दिवसांत तीन वेळा राष्ट्रीय विक्रम मोडला जाणे हे अत्यंत प्रेरणादायी आहे. गुरिंदरवीर सिंह आणि अनिमेष कुजूर यांच्याशी झालेल्या फोन संभाषणाचाही त्यांनी उल्लेख केला आणि दोन्ही खेळाडूंच्या जिद्दीचे कौतुक केले.देशातील वाढत्या उष्णतेबाबत बोलताना पंतप्रधानांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिणे आणि गरज नसताना उन्हात बाहेर न जाण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्यांनी पारंपरिक भारतीय पेयांचे महत्त्वही अधोरेखित केले.
आम पन्हा, लस्सी, ताक, सत्तू, कोकम शरबत, सोल कढी, पानकम, नीर मोर आणि बेल पना यांसारख्या पेयांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, ही पेये केवळ तहान भागवत नाहीत तर शरीराला उष्णतेपासून संरक्षणही देतात.आंब्यांचा उल्लेख करताना पीएम मोदी म्हणाले की, भारतातील प्रत्येक प्रदेशाला स्वतःची वेगळी आंब्याची ओळख आहे. अल्फान्सो, केसर, दशेरी, लंगडा, जर्दालू, चौसा, मालदा, हिमसागर आणि बंगनपल्ली यांसारख्या आंब्यांचा त्यांनी उल्लेख केला आणि हे आंबे भारताच्या संस्कृतीचा भाग असल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले की, भारतीय आंबे आता जागतिक बाजारपेठेत पोहोचत आहेत, ही देशाच्या कृषी क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे.परदेश दौऱ्याचा उल्लेख करताना त्यांनी नेदरलँड्समध्ये भारताला परत मिळालेल्या चोळा काळातील प्राचीन ताम्रपटांचा उल्लेख केला. या ऐतिहासिक वस्तू भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे महत्त्व दर्शवतात, असे त्यांनी सांगितले.यासोबतच उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील आकाश गुप्ता यांच्या नदी स्वच्छता उपक्रमाचेही पीएम मोदींनी विशेष कौतुक केले. मनोरमा नदी स्वच्छ करण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे परिसरात स्वच्छतेबाबत जागरूकता वाढल्याचे त्यांनी सांगितले.