आरसीबी-जीटी फायनलपूर्वी पोलिसांचा अलर्ट

    दिनांक :31-May-2026
Total Views |
बंगळूरु
Alert before RCB-GT final आज होणाऱ्या आयपीएल फायनलपूर्वी बंगळूरु शहर पोलिसांनी आरसीबी आणि गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी कडक सूचना जारी केली आहे. शहरात कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक जल्लोषाला किंवा बाईक रॅलीला परवानगी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून नियम मोडल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.आरसीबी दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद जिंकण्याच्या तयारीत असून, अंतिम सामन्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मात्र मागील वर्षीच्या विजयोत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर यावेळी प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घेतली आहे. ४ जून २०२५ रोजी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे यंदा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
 
 
 
gt and rcb
 
बंगळूरुचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की, मॉल्स, पब्स आणि सार्वजनिक ठिकाणी बाहेरच्या दिशेने असलेल्या एलईडी स्क्रीनवर सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यास बंदी असेल. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पूर्वपरवानगीशिवाय सामना दाखवता येणार नाही. तसेच रस्त्यांवर गर्दी होईल अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी बाईक रॅली, अतिवेगाने वाहन चालवणे, स्टंट रायडिंग, अनावश्यक हॉर्न वाजवणे, फटाक्यांचा वापर आणि रस्ता अडवणे यावरही बंदी घातली आहे. सामन्याच्या निकालानंतर शहरात कोणताही सार्वजनिक जल्लोष करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
 
याशिवाय सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, असभ्य वर्तन आणि हिंसक कृतींवर कडक नजर ठेवली जाणार आहे. सोशल मीडियावर अफवा, चिथावणीखोर पोस्ट किंवा द्वेषपूर्ण संदेश पसरवणाऱ्यांवरही कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी चाहत्यांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही प्रकारे विरोधी संघाच्या समर्थकांना चिथावणी न देण्याचे आवाहन केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सर्व नागरिकांची जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.