जॅकलिन फर्नांडिससह 15 जणांवर आरोप निश्चित!

पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा निर्णय

    दिनांक :31-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Allegations against Jacqueline Fernandez बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला 200 कोटी रुपयांच्या कथित फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने या प्रकरणात जॅकलिनसह सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना मारिया पॉल आणि इतर 14 आरोपींविरुद्ध मनी लाँड्रिंग कायदाअंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे आता जॅकलिनला अधिकृतपणे न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. न्यायालयाने तपास यंत्रणांनी सादर केलेले पुरावे आणि कागदपत्रांचा प्राथमिक आढावा घेतल्यानंतर संबंधित आरोपींविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगमध्ये सहभाग असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे खटला पुढे चालवण्यासाठी पुरेसा आधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
 
Jacqueline Fernandez
अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासानुसार, सुकेश चंद्रशेखर हा तुरुंगात असतानाही एक मोठे फसवणूक रॅकेट चालवत होता. तो स्वतःला सरकारी यंत्रणांतील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत लोकांची फसवणूक करत असे. बनावट ओळख, खोटे फोन कॉल आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून त्याने सुमारे 200 कोटी रुपयांहून अधिक रक्कम उकळल्याचा आरोप आहे. या कथित बेकायदेशीर पैशांतून आलिशान मालमत्ता, महागड्या गाड्या आणि लक्झरी भेटवस्तू खरेदी केल्याचेही तपासात समोर आले आहे. ईडीच्या आरोपपत्रानुसार, सुकेशने जॅकलिन फर्नांडिसला सुमारे 5.71 कोटी रुपयांच्या मौल्यवान भेटवस्तू दिल्या होत्या, ज्यामध्ये दागिने आणि लक्झरी वस्तूंचा समावेश होता. ईडीचा दावा आहे की सुकेशचा गुन्हेगारी इतिहास माहिती असूनही जॅकलिनने त्याच्याकडून भेटवस्तू स्वीकारल्या. तसेच चौकशीदरम्यान तिच्या जबाबांमध्ये विसंगती आढळल्याचा आरोपही तपास यंत्रणेने केला आहे. या प्रकरणात कोर्टाच्या आदेशानंतर पुढील सुनावणी निर्णायक ठरणार आहे.