मुंबई
Amitabh Bachchan अवघ्या १५ व्या वर्षी आपल्या दमदार फलंदाजीने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणारा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या महत्त्वाच्या सामन्यात वैभवने केलेल्या आक्रमक खेळीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही त्याच्या प्रतिभेचे भरभरून कौतुक केले आहे.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने अवघ्या ४७ चेंडूंमध्ये ९६ धावांची तुफानी खेळी साकारली. शतकाच्या अगदी उंबरठ्यावर असताना तो बाद झाला. मात्र त्याच्या या शानदार खेळीने क्रिकेटप्रेमींना आणि तज्ज्ञांनाही प्रभावित केले. इतक्या कमी वयात दाखवलेल्या परिपक्वतेमुळे वैभवचे नाव देशभरात चर्चिले जात आहे.
वैभवच्या खेळीने प्रभावित झालेल्या अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत त्याचे कौतुक केले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “सूर्यवंशी – १५ वर्षांचा अद्भूत सूर्या. या वयात तर मी विटीदांडूसुद्धा नीट खेळत नव्हतो.” बिग बी यांच्या या प्रतिक्रियेनंतर वैभवच्या कामगिरीची आणखी चर्चा रंगली असून चाहत्यांकडूनही त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.