-हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट यांची माहिती
नागपूर,
Artificial Intelligence हृदयोपचारात तपासणीच्या सुरुवातीच्या टप्यात राहून जाणाऱ्या अतिशय सूक्ष्म लक्षणांचा शोध घेण्यासाठी आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर आधारित साधनांचाही विकास केला जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा उपचाराचा एक अतिरिक्त आधार ठरू शकतो ज्यामुळे डॉक्टरांना उच्च जोखीम असलेल्या रुग्णांची सुरुवातीच्या काळातच ओळख पटवणे सोपे होईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ व स्वास्थम रुग्णालयाचे संचालक डॉ. पंकज हरकुट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, काही गंभीर हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये (हार्ट अटॅक) पारंपरिक पद्धतीने निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ईसीजी’ चाचणीत नेहमीप्रमाणे दिसणारे बदल दिसून येत नाहीत. हृदयविकाराचा झटका आलेल्या 100 रुग्णांपैकी जवळपास 30 रुग्णांचा ईसीजी नॉर्मल असल्याचे स्पष्ट झाले आहे. ईसीजी रिपोर्ट सामान्य दिसत असला, तरीही काही प्रकरणांमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा असू शकतो. यामुळे आजाराचे वेळेवर निदान होण्यास व उपचारांना उशीर होण्याचा धोका वाढतो. ईसीजीमध्ये नेहमीसारखे बदल दिसले नाहीत, तर परिस्थिती गंभीर नाही, असे अनेकांना वाटते. मात्र, पूर्णपणे ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या असलेल्या काही रुग्णांमध्येही पारंपरिक निदानाचे निकष दिसून येत नाहीत.
Artificial Intelligence छातीतील दुखण्याकडे केवळ एका ईसीजीच्या आधारावर पाहून दुर्लक्ष करू नये. छातीत सतत अस्वस्थ वाटणे, धाप लागणे, प्रचंड घाम येणे, थकवा जाणवणे किंवा छातीतील वेदना जबडा, मान, खांदे किया हातापर्यंत पसरणे यांसारख्या लक्षणांची त्वरित तपासणी केली पाहिजे. मधुमेह, उच्च रक्तदाब, धुम्रपानाची सवय, लठ्ठपणा आहे किंवा ज्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे, अशांनी विशेष काळजी घ्यायला हवी, यावर डॉ. हरकूट यांनी भर दिला. डॉ. अभिजित रोकडे, पी. आर. काटे उपस्थित होते.