सोलापूर
Barshi cricket camp accident सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात क्रिकेट प्रशिक्षणादरम्यान घडलेल्या भीषण अपघातामुळे १५ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.शिवशक्ती मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट समर कॅम्पदरम्यान ही दुर्घटना शनिवारी सकाळी घडली.
आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी (वय १५), इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थी, हा या समर कॅम्पमध्ये सहभागी झाला होता. क्रिकेट शिकण्याची तीव्र आवड असलेल्या आरवचा सरावादरम्यान जड लोखंडी रोलरखाली सापडून गंभीर अपघात झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने या मैदानावर क्रिकेट समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साधारण ७ ते ७.३० च्या सुमारास १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांकडून पिच सपाट करण्यासाठी वापरला जाणारा जड लोखंडी रोलर ओढण्याचे काम करून घेतले जात होते. त्या वेळी मुख्य प्रशिक्षक आणि संबंधित कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सरावादरम्यान आरवचा अचानक Barshi cricket camp accident पाय घसरला आणि तो जमिनीवर कोसळला. त्याच वेळी इतर मुलांच्या मदतीने ओढला जाणारा जड रोलर त्याच्या अंगावरून गेला. या अपघातात त्याला छातीसह शरीराच्या अनेक भागांना गंभीर अंतर्गत दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी बार्शीतील जगदाळे मामा रुग्णालय येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.या दुर्दैवी घटनेमुळे आरवच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून शहरातही संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, बार्शी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. क्रिकेट प्रशिक्षणादरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.