भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून भाविकांसाठी खुले

ऑनलाइन नोंदणी अनिवार्य

    दिनांक :31-May-2026
Total Views |
पुणे,
Bhimashankar Temple will Open पुण्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पुन्हा एकदा भाविकांसाठी खुले होणार आहे. तब्बल काही महिन्यांच्या नूतनीकरण आणि विकासकामांनंतर मंदिर प्रशासनाने 15 जून 2026 पासून नियमित दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सन 2027 मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू होती. मंदिराचा मुख्य सभामंडप आणि पायरीमार्गाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून भाविकांच्या सोयीसाठी आधुनिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. या कामांमुळे मंदिर 9 जानेवारी 2026 पासून तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते, त्यानंतर ही मुदत 31 मे 2026 पर्यंत वाढवण्यात आली होती.
 
 
bhimashankar temple
 
मंदिर प्रशासनाने दर्शन प्रक्रियेत पारदर्शकता आणि गर्दी नियंत्रणासाठी नवीन नियम लागू केले आहेत. 5 जून 2026 पासून ऑनलाइन नोंदणी सुरू होणार असून भाविकांना मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच पास मिळवावा लागणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात दररोज फक्त 1000 भाविकांनाच दर्शनाची परवानगी दिली जाणार आहे.15 जून ते 30 जून 2026 या कालावधीत दर्शनाची वेळ सकाळी 7 ते 11 अशी निश्चित करण्यात आली आहे. दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र आणि ऑनलाइन पास सोबत ठेवणे अनिवार्य असणार आहे. नोंदणी केलेल्या भाविकांची यादीही अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी भाविकांना सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन करत दर्शन प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यावर भर दिला आहे.