मुंबई,
BJP, Shiv Sena, and NCP राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकांसाठी महायुतीने अखेर जागावाटपाचा पेच सोडवला आहे. अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चांनंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात १७ जागांबाबत अंतिम सहमती झाली असून निवडणुकीसाठी संयुक्त रणनीती निश्चित करण्यात आली आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजप ११, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. जागावाटपाच्या प्रक्रियेत अनेक मतदारसंघांवर तिन्ही पक्षांनी दावा ठोकल्याने मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाच्या आधारे भाजपचे सुमारे १४ जागांवर वर्चस्व असतानाही मित्रपक्षांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी भाजपने तडजोडीची भूमिका स्वीकारल्याची माहिती आहे. त्यामुळे निवडणूक महायुतीच्या चिन्हाखाली आणि एकजुटीने लढवण्याचा मार्ग मोकळा झाला.

शिवसेनेने आपला प्रभाव असलेल्या सहा जागांवर दावा केला होता. मात्र अंतिम चर्चेत पक्षाला चार जागांवर समाधान मानावे लागले. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या जागांवरून विशेष चर्चा झाली. दोन्ही जागा शिवसेनेच्या पारंपरिक मानल्या जात असल्या तरी भाजपने त्यापैकी एका जागेवर दावा केला होता. अखेर नाशिकची जागा शिवसेनेकडे तर छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघ भाजपकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा केला होता. दीर्घ चर्चेनंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला. त्याबदल्यात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासंदर्भात समन्वयाचा मार्ग काढण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे, परभणी-हिंगोली आणि कोकण या तीन मतदारसंघांवर जोरदार दावा केला होता. अखेर पुणे आणि कोकण या दोन जागा राष्ट्रवादीच्या खात्यात गेल्या, तर परभणी-हिंगोली मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादीला अतिरिक्त जागा मिळवण्यात यश आले असल्याचे मानले जात आहे.अंतिम वाटपानुसार भाजप सोलापूर, जळगाव, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर-जालना, अहिल्यानगर, सांगली-सातारा आणि नांदेड या ११ मतदारसंघांत निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, नाशिक, परभणी-हिंगोली आणि यवतमाळ या चार जागा आल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि कोकण या दोन मतदारसंघांत उमेदवार उभे करणार आहे.