हिमाचलमध्ये भाजपची दमदार मुसंडी

काँग्रेसला स्थानिक निवडणुकांत धक्का

    दिनांक :31-May-2026
Total Views |
मंडी,
BJP's Strong Surge in Himachal हिमाचल प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने उल्लेखनीय कामगिरी करत काँग्रेसला मोठा राजकीय धक्का दिला आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता असतानाही चार प्रमुख महापालिकांपैकी तीन ठिकाणी भाजपने विजयाची पताका फडकावली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. जाहीर झालेल्या निकालांनुसार मंडी, धर्मशाळा आणि सोलन या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजपने स्पष्ट आघाडी घेत सत्ता मिळवली आहे. मंडी महापालिकेतील 14 जागांपैकी 12 जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला. धर्मशाळा महापालिकेत 17 पैकी 11 जागा भाजपच्या खात्यात गेल्या, तर सोलनमध्ये 17 पैकी 10 जागांवर भाजपने बाजी मारली.
 
 
Himachal
 
दुसरीकडे, पालमपूर महापालिकेत काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखत 11 जागांवर विजय मिळवला. भाजपला येथे केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे पालमपूरमध्ये काँग्रेसने आपला गड कायम ठेवला असला तरी इतर प्रमुख शहरी भागांतील निकालांनी पक्षाची चिंता वाढवली आहे. विशेष म्हणजे, पुढील वर्षी हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी झालेल्या या स्थानिक निवडणुकांकडे राजकीय पक्षांच्या ताकदीची चाचणी म्हणून पाहिले जात होते. अशा परिस्थितीत तीन महापालिकांमधील भाजपच्या यशामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.