चंबा,
Car plunges into gorge in Chamba हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात घडलेल्या भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची कार खोल दरीत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी मध्यरात्री चुरा उपविभागातील बैरागढ–सच पास–किलाड मार्गावर हा अपघात घडला. छत्तीसगडमधील दोन कुटुंबे एर्टिगा कारमधून पर्यटनासाठी सच पासकडे जात होती. मात्र अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट खोल दरीत कोसळली आणि मोठा अपघात घडला.

या घटनेनंतर पर्यटक वेळेत हॉटेलमध्ये परत न आल्याने आणि त्यांच्याशी संपर्क न झाल्याने चिंता व्यक्त करण्यात आली होती. हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. दुर्गम आणि खोल दरीच्या भागामुळे बचाव पथकाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.शोधमोहीमेदरम्यान रस्त्यालगत खोल दरीत कोसळलेली कार आढळून आली असून वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. प्राथमिक तपासात वाहनातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात छत्तीसगडमधील अरविंद, त्यांची पत्नी प्राची, त्यांची दोन मुले दर्श आणि अपशाद, तसेच पी. जी. कार्तिगेयन, त्यांची पत्नी मणिमाला आणि मुलगा नंदन यांचा समावेश आहे. स्थानिक चालक विश्वास यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबांवर काळाने घाला घातल्याची भावना व्यक्त होत असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.