चिराग त्यागी हत्या प्रकरणाचा उलगडा!

सहकाऱ्यानेच घेतला सूड

    दिनांक :31-May-2026
Total Views |
गाझियाबाद,
Chirag Tyagi Murder Case Solved गाझियाबादमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करणाऱ्या पॅरा-ॲथलीट चिराग त्यागीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणात त्याचा जवळचा सहकारी आणि स्वतःही पॅरा-ॲथलीट असलेला यश खाटिक यालाच अटक करण्यात आली असून, सूडाच्या भावनेतून ही हत्या झाल्याचे तपासात समोर आले आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, चिराग त्यागीचा मृतदेह गाझियाबादमधील साई उपवन परिसरात आढळला होता. घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चिराग आणि यश खाटिक हे दोघेही एकत्र ओला कॅबने दिल्लीहून हिंडन भागात गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दोघे साई उपवन येथे पोहोचले आणि तिथेच ही घटना घडली.
 
 
 
Chirag Tyagi Murder
तपासादरम्यान पोलिसांनी मुरादनगर येथील रहिवासी यश खाटिकला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. यश खाटिकने स्वतःही पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भाग घेतला असून तो आणि चिराग पूर्वी एकत्र सराव करत होते तसेच स्पर्धांमध्येही सहभागी झाले होते.मात्र कागदपत्रांच्या पडताळणीदरम्यान चिराग त्यागीने यशविरुद्ध तक्रार दाखल केल्याने यशची पात्रता रद्द झाली होती, अशी माहिती समोर आली आहे. याच कारणातून त्याच्या मनात राग निर्माण झाला आणि सूड घेण्याच्या उद्देशाने त्याने चिरागवर गोळी झाडून हत्या केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर चिरागच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीकडून हत्येत वापरलेले शस्त्र जप्त करण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.