विषारी दारू प्रकरणात मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत

    दिनांक :31-May-2026
Total Views |
पिंपरी-चिंचवड,
Death in poisonous liquor case पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिऊन झालेल्या मृत्यू प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याची घोषणा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.शनिवारी फुगेवाडी परिसराला भेट देऊन गिरीश महाजन यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. मृतांच्या कुटुंबीयांच्या अडचणी समजून घेत सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
Death in poisonous liquor case
 
माध्यमांशी बोलताना महाजन यांनी या प्रकरणावर गंभीर प्रतिक्रिया देत विषारी दारूच्या विक्रीबाबत कठोर कारवाईचे संकेत दिले. मिथेनॉलचे मिश्रण करून ही दारू विकली जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या प्रकरणात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने 13 जणांना निलंबित केले असून, पुढील तपास अधिक तीव्र करण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते स्थानिक पातळीवरील यंत्रणांपर्यंत कुणीही दोषी आढळल्यास त्यांना सोडले जाणार नाही, असा इशाराही महाजन यांनी दिला आहे. दरम्यान, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलली जातील आणि अवैध दारू विक्रीवर पूर्णपणे आळा घालण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.