गडचिरोली
Distribution Cookstoves in Gadchiroli गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम धानोरा आणि एटापल्ली तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुलींच्या उपक्रमाने मोठे यश मिळवले असून आतापर्यंत सुमारे २० हजार कुटुंबांपर्यंत या सुधारित चुली पोहोचल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा उपक्रम ग्रामीण भागात स्वच्छ ऊर्जा, आरोग्य सुधारणा आणि पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
क्लीन मॅक्स उर्जित एलएलपी आणि क्लायमेटसेन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे ग्रामीण महिलांच्या दैनंदिन जीवनात लक्षणीय बदल दिसून येत आहे. घरातील धूर कमी झाल्याने श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि इतर आरोग्य समस्या घटल्या असून स्वयंपाकघर अधिक सुरक्षित आणि स्वच्छ झाले आहे.या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा महिलांना झाला आहे. पूर्वी जळाऊ लाकूड गोळा करण्यासाठी जंगलात जावे लागायचे, मात्र आता इंधनाची गरज कमी झाल्याने त्यांचा वेळ आणि श्रम वाचत आहेत. त्यामुळे त्या शिक्षण, उपजीविका आणि इतर कौशल्य विकासाच्या कामांकडे अधिक लक्ष देऊ शकत आहेत.
पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकडाची बचत होत असून जंगलांवरील दबाव कमी होत आहे. त्यामुळे जैवविविधतेचे संरक्षण आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन याला चालना मिळत आहे. तसेच कार्बन उत्सर्जन कमी होऊन हवामान बदलाच्या परिणामांना आळा घालण्यासही मदत होत आहे. या यशस्वी उपक्रमामुळे गडचिरोलीतील आदिवासी भागात शाश्वत विकासाचे नवे मॉडेल तयार होत असून हा प्रयोग राज्यातील इतर दुर्गम भागांसाठीही दिशादर्शक ठरत आहे.