गुकेशचा मास्टरस्ट्रोक तर दिव्या अव्वल!

    दिनांक :31-May-2026
Total Views |
ओस्लो,
Divya Tops the Table ओस्लो येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठित नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. स्पर्धेच्या पाचव्या फेरीत विश्वविजेता डी. गुकेश याने आर. प्रज्ञानंदावर मात करत महत्त्वाचा विजय मिळवला, तर महिला विभागात दिव्या देशमुखने शानदार कामगिरी करत गुणतालिकेतील पहिले स्थान पटकावले. स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेच्या सामन्यात दोन भारतीय युवा ग्रँडमास्टर्स आमनेसामने आले होते. सुरुवातीपासूनच प्रज्ञानंदाने आक्रमक आणि संयमी खेळ करत सामन्यावर पकड मिळवली होती. बराच काळ तो आघाडीवर दिसत होता. मात्र, अखेरच्या टप्प्यात वेळेच्या दबावाखाली काही चुका झाल्याने परिस्थिती बदलली. या संधीचा अचूक फायदा घेत गुकेशने खेळाचे पारडे आपल्या बाजूने झुकवले आणि अखेर विजयाची नोंद केली.
 
 

दिव्या देशमुख 
 
दरम्यान, जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसेनला अमेरिकेच्या वेस्ली सो याच्याकडून धक्का बसला. दीर्घकाळ रंगलेल्या या सामन्यात वेस्ली सोने संयम राखत एंडगेममध्ये वर्चस्व मिळवले आणि कार्लसेनला पराभव स्वीकारावा लागला.दुसऱ्या महत्त्वाच्या लढतीत अलीरेझा फिरौजा आणि व्हिन्सेंट केमर यांच्यातील क्लासिकल सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर झालेल्या आर्मागेडन टायब्रेकमध्ये फिरौजाने विजय मिळवत अतिरिक्त गुणांची कमाई केली आणि गुणतालिकेतील आपले स्थान अधिक भक्कम केले.
 
 
महिला विभागात भारताच्या दिव्या देशमुखने पुन्हा एकदा प्रभावी खेळाचे प्रदर्शन केले. चीनच्या झू जिनरविरुद्धचा सामना बराच काळ तोलामोलाचा राहिला. मात्र, निर्णायक क्षणी दिव्याने अचूक चाली खेळत विजय मिळवला. या यशामुळे ती स्पर्धेच्या महिला गटात अव्वल स्थानावर पोहोचली असून विजेतेपदाच्या शर्यतीतील प्रमुख दावेदार म्हणून उदयास आली आहे.युक्रेनच्या अॅना मुझीचुक आणि बिबिसारा असाउबायेवा यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. मात्र, आर्मागेडन टायब्रेकमध्ये मुझीचुकने बाजी मारत अतिरिक्त गुण मिळवले. तसेच विद्यमान महिला विश्वविजेती जू वेनजुन आणि भारताची कोनेरू हम्पी यांच्यातील क्लासिकल लढतही अनिर्णित राहिली. टायब्रेकमध्ये हम्पीने उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला. पाच फेऱ्यांनंतर पुरुष गटातील स्पर्धा अधिक रंगतदार बनली असून अव्वल स्थानासाठीची चुरस वाढली आहे. दुसरीकडे, दिव्या देशमुखच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे महिला विभागात भारताच्या आशा अधिक उंचावल्या आहेत.