नवी दिल्ली,
General Subramani became CDS देशाच्या संरक्षण व्यवस्थेत मोठा बदल करत सरकारने जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांची संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती केली असून त्यांनी औपचारिकपणे पदभार स्वीकारला आहे. त्यांनी निवृत्त होणारे सीडीएस जनरल अनिल चौहान यांची जागा घेतली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना जनरल सुब्रमणी यांनी देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सरकारचे आभार मानले. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्यात अधिक समन्वय साधून संयुक्त लष्करी शक्ती मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांच्या ‘जेएआय' म्हणजेच संयुक्तता, आत्मनिर्भरता आणि नवोपक्रम या संकल्पनेनुसार संरक्षण क्षेत्राचा विकास हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

संरक्षण दल प्रमुख म्हणून त्यांची मुख्य जबाबदारी तिन्ही सैन्य दलांचे आधुनिकीकरण करणे, थिएटर कमांड प्रणाली मजबूत करणे आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाला गती देणे अशी असेल. देशाच्या संरक्षण स्वावलंबनाला बळ देणे हा त्यांच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग राहणार आहे. लष्करी कारकिर्दीत जनरल सुब्रमणी यांनी अनेक महत्त्वाच्या आणि कठीण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आसाममधील बंडखोरीविरोधी मोहिमांपासून ते जम्मू-काश्मीर आणि सीमावर्ती भागांतील ऑपरेशन्सपर्यंत त्यांनी नेतृत्व केले आहे. २ कॉर्प्स (खडगा कॉर्प्स) सारख्या महत्त्वाच्या स्ट्राइक युनिटचेही त्यांनी नेतृत्व केले असून उपसेनाप्रमुख आणि सेंट्रल कमांडचे प्रमुख अशा उच्च पदांवरही त्यांनी सेवा बजावली आहे.
त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी परदेशातही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कझाकस्तानमध्ये डिफेन्स अटॅशे म्हणून त्यांनी काम केले असून संरक्षण मंत्रालयाच्या महत्त्वाच्या गुप्तचर आणि रणनीती विभागांमध्येही त्यांनी भूमिका बजावली आहे. चीन आणि पाकिस्तान सीमांवरील ऑपरेशनल परिस्थितीचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदक यांसारख्या उच्च सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. देशाच्या संरक्षण धोरणाला नवी दिशा देण्याची मोठी जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली आहे.